गंगापूर नगरपरिषदेतील गैरव्यवहारप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी अहवाल मागविणार – मंत्री दीपक केसरकर
गंगापूर नगर परिषदेअंतर्गत जनतेस सोयी–सुविधा देण्यासाठी आवश्यक कामे विहित निविदा प्रक्रिया राबवून करीत आहेत. या कामांसाठी प्राप्त निविदांपैकी कमी दराच्या निविदाधारकांसोबत करारनामा करून कार्यारंभ आदेश देऊन कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांची शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड या त्रयस्त संस्थेकडून तपासणी करण्यात आली आहे. या कामामध्ये विलंब किंवा गैरव्यवहार झाला असल्यास त्याची जिल्हाधिकाऱ्यंमार्फत १५ दिवसात चौकशी करून अहवाल मागविण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य सतीश चव्हाण यांनी गंगापूर नगर परिषदेविषयीची लक्षवेधी मांडली होती. यास उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते.
पाणीपुरवठा संबंधित कामांसाठी वेळोवेळी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, प्रतिसाद प्राप्त न झाल्याने, पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवांतर्गत स्थानिक पातळीवर वर्तमानपत्रामध्ये निविदा प्रसिद्ध करून कमी दराच्या निविदाधारकास कार्यारंभ आदेश देण्यात आले. ज्या कंत्राटदारास रस्त्याची कामे देण्यात आली, ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत आहेत. कामास विलंब किंवा गैरव्यवहार झाला असल्यास चौकशी अहवाल मागविण्यात येईल, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.