अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन योजना व मानधन वाढ करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
अंगणवाडी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळासोबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.
मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अंगणवाड्यांची संख्या जास्त आहे. आपण दरवर्षी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट देतो. कोविड काळात मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रूपयाचे सानुग्रह अनूदान दिले. महिला व बालविकास विभाग अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेहमीच पाठीशी असतो. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना सबंधिताना मंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रूबल अग्रवाल, उपसचिव वि. रा. ठाकूर, एकात्मिक बाल विकास उपायुक्त गोकुळ देवरे, उपायुक्त विजय क्षीरसागर, अंगणवाडी कर्मचारी समितीचे एम. ए. पाटील, राजेश सिंह, निशा शिवूरकर, विजया सांगळे, अनिता कुलकर्णी, अरूणा अलोणे, माया पवार, चंदा लिगरवार, हुकुमताई ठमके उपस्थित होते.