इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी होतेय रेशीम व्यवसायाची वाडी
पुणे : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावातील शेतकरी तुतीची लागवड करून रेशीम व्यवसायाकडे वळत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि रेशीम संचालनालयातर्फे अल्पभूधारक शेकऱ्यांना अनुदान देण्यात येत असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरला आहे.साधारण २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात मोजके शेतकरी २००६ पासून या क्षेत्राकडे वळले आहेत. त्यातील काहींनी पुन्हा पारंपरिक शेती सुरू केली. मात्र गेल्या दोन वर्षात रेशमाच्या कोशाला मिळणारा चांगला दर आणि इतर पिकांपेक्षा अधिकचे होणारे उत्पन्न यामुळे शेतकरी तुतीच्या लागवडीकडे वळले आहेत.पाच वर्षापूर्वी केवळ ५ ते ६ शेतकरी तुतीची लागवड करीत होते.
गेल्यावर्षी ही संख्या ३६ वर पोहोचली आणि ७३ नव्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. इंदापूर तालुक्यातील ३११ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली असून त्यापैकी ३६ एकर म्हसोबावाडीतील आहे. यात आणखी प्रति शेतकरी एक एकर याप्रमाणे ७३ एकरची भर पडणार आहे.शेतकरी रेशीम उद्योगासाठी लागणारे अंडीपुंज कर्नाटक अणि गडहिंग्लज येथून आणतात. काही बाल्यावस्थेत केंद्रात (चॉकी सेंटर) १० दिवस सांभाळलेल्या बाल्यावस्थेतील अळ्यादेखील उपलब्ध होतात. संगोपन गृहातील बेडवर १७ ते १८ दिवसात कोश तयार होतात. हे कोश साधारण ५ ते ६ दिवसात विक्रीसाठी तयार होतात. पहिल्या वर्षी एक किंवा दोन बॅच घेता येतात. नंतर पाच बॅचपर्यंत उत्पादन वाढविता येते.
इतर पिकांच्या तुलनेत पाणी कमी लागते. हा तसा कोरडा पट्टा असल्याने शेतकरी शेततळे करून कमी पाण्यात तुतीची लागवड करीत आहेत. आर्थिक उत्पन्न चांगले होत असल्याने स्वत: खर्च करून एक एकर क्षेत्र वाढविले.
-मनोज चांदगुडे, शेतकरी म्हसोबावाडी
पूर्वी ऊस, कांदा घ्यायचो. मात्र चांगले दर मिळत नसल्याने आणि पाणी अधिक लागत असल्याने रेशीम शेतीकडे वळलो. आता चार बॅचेसमधून ५ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. या उद्योगात कष्टही तुलनेत कमी आहेत.
-नामदेव चांदगुडे, शेतकरी म्हसोबावाडी
शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा हा व्यवसाय अधिक लाभदायक वाटल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत आहेत. हा कोरडा पट्टा असल्याने कमी पाण्यात शेतकरी तुतीची लागवड करून शकतात. त्यांना मार्गदर्शन करून म्हसोबावाडीत आणखी क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न आहेत.
– बाळासाहेब माने, क्षेत्र सहाय्यक इंदापूर
असे आहे अर्थकारण
एक एकर क्षेत्रात २५० अंडीपुंजांची एक बॅच असते. १००० अंडीपुंजापासून सरासरी ८०० किलोपेक्षा अधिकचे कोश तयार होतात. सरासरी ६०० रुपये दराने ४ लाख ८० हजार उत्पन्न मिळते. दर चांगला मिळाल्यास हे उत्पन्न ७ लाखापर्यंतही जाते. एका बॅचला सरासरी २५ हजार खर्च येत असल्याने रेशीम उद्योग किफायतशीर ठरू शकतो.