मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास पूरक ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई। सह्याद्री लाइव्ह । राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफ लाईन ठरणारा मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ कॉरिडोर (एक्वा लाईन) मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारीपुत नगर, आरे कॉलनी येथे झाला. यावेळी आमदार दिलीप लांडे, अतुल भातखळकर, जपान सरकारचे डेप्युटी कौन्सुल जनरल तोशीहिरो कानेको, मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य सरकार सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना प्राधान्य देत आहे. मेट्रो ३ च्या पूर्णत्वानंतर सुमारे १७ लाख प्रवासी प्रवास करू शकणार असून यामुळे रस्त्यावरील सुमारे सात लाख खासगी वाहनांची संख्या कमी होईल. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच वायू आणि ध्वनी प्रदूषणदेखील कमी होईल. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होईल.
ज्या राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असते, तेथील नागरिक त्याचा वापर करतात, पर्यायाने रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होते असे सांगून बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा सुद्धा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूर ते मुंबईपर्यंतच्या अनेक जिल्ह्यांना लाभ होणार असून लवकरच या मार्गाच्या नागपूर शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जनहिताच्या प्रत्येक प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या पाठीशी असून राज्य आणि केंद्र सरकार मिळून विविध महत्त्वाचे प्रकल्प गतीने पूर्ण करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मेट्रो ३ च्या यशस्वी चाचणीसाठी त्यांनी अश्विनी भिडे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मेट्रो ३ च्या पूर्णत्वाने आत्मीय समाधान लाभेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, मुंबई मेट्रो 3 ही मुंबईची महत्त्वाची लाईफ लाईन बनणार आहे. या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण चाचणी आज यशस्वी झाली आहे. या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. या मेट्रोमुळे रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होणार असल्याने सुमारे 2.30 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. जी झाडे तोडावी लागली, त्यांनी जितके कार्बन शोषून घेतले असते, मेट्रोमुळे केवळ ८० दिवसात तेवढे कमी उत्सर्जन होईल, असे त्यांनी सांगितले. हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व घटकांचा परामर्श घेऊन या प्रकल्पाला परवानगी दिली असल्याने पर्यावरणाचा विचार करूनच मुंबईच्या हितासाठी जो निर्णय घेणे आवश्यक होते, ते निर्णय शासनाने घेतल्याचे ते म्हणाले. या मेट्रो लाईनमुळे मुंबईतील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर आत्मीय समाधान लाभेल, असे त्यांनी सांगितले.
मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी प्रास्ताविकाद्वारे मेट्रो ३ ची वैशिष्टे सांगून डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
मुंबई मेट्रो लाईन ३ ची (कुलाबा– बांद्रा–सीप्झ कॉरिडॉर) ठळक वैशिष्ट्ये
मुंबई मेट्रो लाईन -३ च्या ट्रेन ८ डब्यांच्या असतील. ७५% Motorisation मुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील.
रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल.
एका गाडीतून अंदाजे २४०० प्रवासी प्रवास करू शकतील.
८५ किमी प्रतितास अशा प्रत्यक्षातील प्रचालन वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल.
स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे मेट्रोचे डबे किमान ३५ वर्षे टिकू शकतील.
ट्रेन प्रचालनासाठी चालक विरहित प्रणाली स्वीकारली असून अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) च्या सिग्नल व्यवस्थेमुळे १२० सेकंदाची frequency ठेवणे शक्य होणार आहे.
प्रवाशांच्या सुलभतेसाठी डब्याच्या प्रत्येक बाजूला चार दरवाजे असतील.
स्वयंचलित प्रकाश नियंत्रण वैशिष्ट्यासह अद्ययावत वीज प्रणाली ऊर्जेचा वापर कमी करण्यास मदत करेल.
ट्रेनच्या छतावर स्थित व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (VVVF) प्रणालीद्वारे वातानुकूलन यंत्रणेचे नियंत्रण केल्याने ४ ते ५ टक्के ऊर्जा बचत होईल.
डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डायऑक्साइड आणि आर्द्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली असल्याने सर्व हवामान परिस्थितीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.
रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक या दोन्हीच्या डिझाइनची योग्यता सिद्ध करून आवश्यतेप्रमाणे पुढील नवीन तांत्रिक सुधारणा अंमलात आणता याव्यात म्हणून ‘मुंबई मेट्रो लाइन -३’ या संपूर्ण भूमिगत मार्गिकेवर आज ट्रेन चाचणी करण्यात आली.
सेवा चाचण्यांचे नियोजन लाईन 3 साठी डेपो सुविधेसोबत आवश्यक संख्येने ट्रेन संच उपलब्ध झाल्यानंतर केले जाईल.