राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थिती सामंजस्य करार
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER) आणि इनिशिएटीव्ह ऑफ चेंज इन इंडिया, पाचगणी (IOFC) या संस्थेने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात (MSFDA) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामजंस्य करार केला.
यावेळी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणेचे रजिस्ट्रार जी. राजा शेखर, राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षण अभियानचे सहसंचालक प्रमोद पाटील यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च (IISER), पुणेचे संचालक जयंत उदगावकर, इनिशिएटीव्ह ऑफ चेंज इन इंडियाचे (IOFC) विश्वस्त किरण गांधी, हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यावेळी उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील नवीन कल्पना शिकवल्या गेल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी केला पाहिजे. त्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता आली पाहिजे. यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे.
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे या संस्थेच्या सायन्स शिक्षकांच्या माध्यमातून जास्त जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचणे. तसेच राज्यामध्ये सध्या दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये सुधारणा करणे. नवीन शैक्षणिक धोरण-2020 नुसार शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणे. हा या संस्थेचा उद्देश आहे. इनिशिएटिव्ह ऑफ चेंज इन इंडिया, पाचगणी (IOFC) ही संस्था ‘मैं बदलूगा तो पुरा देश बदलेगा’ या संकल्पनेनुसार काम करते. या संस्थेचे 60 देशांमध्ये काम चालू आहे. परिवर्तन घडविणे, आत्मनिर्भर करणे, चरित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे कार्य संस्था करते आहे. असोसिएट डीन सौरभ दुबे यांनी या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या कामकाजाविषयी माहिती दिली.