नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी लवकरच मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन – पालकमंत्री बच्चू कडू
अकोला : प्रस्तावित नवीन पदवीपूर्व पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेला वित्तीय तरतूदीसाठीचा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी लवकरच मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.
अकोला येथे नविन पदवीपूर्व पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या कामाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नवीन पदवीपुर्व पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. मिलिंद थोरात, सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली की, या प्रकल्पासाठी २७.१४ हेक्टर आर जमिन प्राप्त झाली असून हस्तांतरण प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. तथापि, या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळ, पायाभुत सुविधा निर्मितीसाठी वित्तीय तरतूद केल्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करणे आवश्यक आहे, त्याशिवाय भारतीय पशुचिकित्सा परिषदेकडे मान्यतेचा प्रस्ताव पाठविता येणार नाही.
त्यासाठी हा मान्यतेचा प्रस्ताव पाठविण्यासाठी शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित व्हावा, यासाठी मंत्रालयस्तरावर लवकरात लवकर बैठक आयोजित करावी,असे निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले. या प्रकल्पाची एकूण किंमत ३५० कोटी रुपये असून एकूण ३३० पदांची आवश्यकता असणार आहे. सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या पशु महाविद्यालयात १३० पदांना मान्यता असल्याने २०० पदे निर्माण करुन भरावी लागतील. त्यांची निर्मिती व नियुक्ती ही महाविद्यालय सुरु होतांना टप्प्या टप्प्याने करता येणे शक्य आहे,असेही यावेळी सांगण्यात आले.