सेंद्रिय शेती उत्पादनांच्या विपणनाला बळ मिळेल – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती : कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनतर्फे संपूर्ण सेंद्रिय प्रमाणित भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य उत्पादनांची बाजारपेठ अर्थात ‘मॉम ऑरगॅनिक मार्केट’चा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज येथे झाला. ‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार सेंद्रिय उत्पादनांसाठी स्वतंत्र बाजार व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नरत असून, ‘मॉम ऑरगॅनिक मार्केट’मुळे त्याला बळ मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
अमरावतीत चिलम छावणी परिसरात विद्यापीठ रस्त्यावर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर सेंद्रिय उत्पादनांचे मार्केट आजपासून सुरू झाले. उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधून उत्पादनांची माहिती घेतली. विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे, तहसीलदार संतोष काकडे, प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे, प्रकल्प संचालक संतोष आळसे, उपसंचालक आरिफ शाह, उपविभागीय कृषी अधिकारी दीप्ती रोडगे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या सहा जिल्ह्यात कार्यरत असून, 395 शेतकरी गटांच्या माध्यमातून 36 जैविक शेती शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणीकृत आहेत. या सहाही जिल्ह्यात मॉम ऑरगॅनिक मार्केट सुरू होत आहेत. जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अचलपूर, चांदूर रेल्वे, तिवसा, धारणी येथील क्लस्टरमधून 50 गटांनी मिळून पाच जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आहेत.
त्यात 1 हजार 69 शेतकरी सदस्य आहेत. सेंद्रिय अन्नधान्य, भाजीपाला, फळे आदींना हक्काची बाजारपेठ मिळाल्याने नियमित विक्रीची सोय झाली आहे. कृषीमालाच्या विपणनासाठी मार्केट उपलब्ध असणे आवश्यक असते. कृषी विभाग व मिशनच्या माध्यमातून ही बाजारपेठ उपलब्ध झाल्याने मिशनमधील सहभागी शेतकरी बांधवांना बळ मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतकरी बांधवांसाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. ग्राहकांचे सातत्य राहण्यासाठी इतर क्षेत्रातून तांदूळ, गूळ आदी उत्पादनेही उपलब्ध ठेवावीत, अशी सूचना आळसे यांनी केली. शाह यांनी सूत्रसंचालन केले.