माणुसकीची वीण : गावकारभारणींनी गतीमंद मुलीला केली आर्थिक मदत
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । गावचं कारभारी पद भूषविणा-या खेड तालुक्यातील गावकारभारणींच्या समाजभिमुखतेचं अनोखं दर्शन घडलं. सरपंच प्रशिक्षणासाठी देण्यात येणारा प्रवास भत्ता या गावकारभारणींनी एका गतीमंद मुलीला देत समाजाप्रतीची माणुसकीची वीण उलगडून दाखविली. सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या सामाजिक दृष्टीचं तालुकाभर कौतुक होत आहे.
राजगुरुनगर येथे ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी गावकारभा-यांना प्रवास भत्ता देण्यात येतो. हा प्रवास भत्ता वराळे, आसखेड, किवळे, वासोली, चांदूस, रोहकल, कडधे, मांजरेवाडी या गावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी प्रवास भत्ता प्रियांका ऊर्फ पिनाताई बाजीराव मांजरे या गतीमंद मुलीला देण्याचे ठरविले.
मांजरेवाडी गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे यांच्या पुढाकारातून खेड तालुक्यातील विविध गावच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी प्रियांका हिला आर्थिक मदत केली.
खेड तालुक्यातील महिला सरपंचांच्या या भूमिकेचं कौतुक होत आहे. यामध्ये वराळे गावच्या सरपंच पूजा बुट्टे पाटील, आसखेडच्या सरपंच प्राची लिंभोरे, मांजरेवाडी गावच्या सरपंच अनिता विलास मांजरे, किवळेच्या सरपंच स्वाती कदम, वासोलीच्या सरपंच कोमल साईनाथ पाचपुते, चांदूस गावच्या सरपंच रूपाली कार्ले, रोहकलच्या सरपंच प्रमिला काचोळे, कडधे गावच्या सरपंच प्रियांका देवदरे, तसेच मांजरेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजिंक्य मांजरे, सदस्या अनिता मांजरे, सदस्य अशोक मांजरे, ग्रामपंचायत सदस्या कांचन मांजरे, वासोलीच्या ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला पिंगळे यांनी प्रियांका हिला आर्थिक मदत देण्यात खारीचा वाटा उचलला.
गावाबरोबरच समाजातील दुर्लक्षित घटकाकडे पाहण्याचा महिला सरपंच आणि सदस्यांचा विचाराचं सर्वत्र कौतुक होत आहे.