मालविकाची कामगिरी महाराष्ट्रासाठी आणि नागपूरकरांसाठी नववर्षाची भेट: सुनील केदार
नागपूर : नागपूरची बॅडमिंटनपटू मालविका बन्सोडने वरिष्ठ गटाच्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत थेट ऑलिम्पिंकपटूला आवाहन दिल्याच्या विक्रमाचे राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी कौतुक केले आहे. नागपूरकर मालविकाच्या या विक्रमानंतर दूरध्वनी करून त्यांनी कौतुक केले आहे. क्रीडा विश्वासाठी ही नव्या वर्षाची भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील क्रीडापटू व क्रीडा उपक्रम यासाठी हे नवीन वर्ष लाभदायी ठरावे, अशी अपेक्षा असून त्याची सुरुवात मालविकाच्या विक्रमापासून झाली आहे. महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर जागतिक स्तरावर नावलौकिक व्हावे,यासाठी क्रीडापटूंना अधिकाधिक सुविधा देण्याबाबत आपला विभाग अग्रेसर आहे. मालविका ही महाराष्ट्र शासनाच्या अनिवासी क्रीडा प्रबोधिनी नागपूर येथील खेळाडू आहे.
शासनाच्यावतीने तिला जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून 50 शटलबॉक्स यापूर्वी दिले असून आताही मागणी प्रमाणे साहित्य उपलब्ध करुन देण्याची कारवाई क्रीडा कार्यालयाकडून सुरू आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल आपल्याला अभिमान असून नागपुरातील व महाराष्ट्रातील अन्य खेळाडूंनी तिच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मालविका बन्सोडने वरिष्ठ गटात काल ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिला पराभूत केले. अवघ्या वीस वर्षाच्या नागपूरकर कन्येने जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू असणाऱ्या सायनाने नेहवाल चा ३४ मिनीटात पराभव करीत खडबड उडवून दिली आहे. मालविकाने २१-१२, २१-९ अशा सेटमध्ये विजय संपादन केला.
क्रीडामंत्री सुनील केदार यांनी मालविकाचे वडील दंतचिकित्सक डॉ. सुबोध बन्सोड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्याकडे मालविका च्या उपलब्धी बद्दल कौतुक केले. यापुढे देखील राज्याचा क्रीडा विभाग मालविकाला सातत्याने मदत करीत राहील, असे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात स्पष्ट केले.