मालेगाव एमआयडीसीमध्ये उद्योग प्रकल्प जलदगतीने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – उद्योग मंत्री सुभाष देसाई
कृषीमंत्री यांनी सोडविल्या मालेगाव एमआयडीसीअंतर्गत उद्योजकांच्या समस्या
मुंबई : मालेगाव येथील एमआयडीसी जलदगतीने उभारण्यात आलेली विशेष एमआयडीसी असून, याअंतर्गत असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. येथील उद्योग प्रकल्प तातडीने सुरू करण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. उद्योग नियमावलीप्रमाणे वस्त्रोद्योग पार्क व अजंग प्रकल्पांसाठी भूखंड वाटपाच्या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले.
मंत्रालयात नाशिक, मालेगाव येथील अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक 3 येथील प्रलंबित कामाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सहसचिव संजय देगांवकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर, अवर सचिव किरण जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
एमआयडीसीअंतर्गत असलेल्या समस्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी मांडल्या. त्यांनी मालेगाव येथील उद्योजकांसाठी केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
उद्योग मंत्री देसाई म्हणाले, मालेगाव एमआयडीसी अंतर्गत अजंग गाव ते औद्योगिक वसाहत पोहोच रस्त्यांच्या कामासंदर्भातील कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी. तसेच अभिन्यांसातील अंतर्गत रस्ते तयार करण्यात यावेत. वस्त्रोद्योग पार्क व अजंग टप्पा क्रमांक ३ भुखंड वाटपाच्या रू ६०० प्रति चौमी या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. यानंतर ७९० प्रमाणे दर करण्यात यावेत.
जे प्रकल्प काम सुरू करत आहेत त्यांना तात्पुरत्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणीपुरवठा योजना क्रमांक दोनसाठी तांत्रिक मंजुरी तसेच निविदा प्रक्रियेची प्रक्रिया करण्यात यावी. वीजेसंदर्भातही सध्या तात्पुरत्या स्वरूपात वीज व्यवस्था करून ऊर्जा विभागासोबत पाठपुरावा करून वीजेसाठी सबस्टेशन कार्यान्वित करावेत. प्लास्टिक, वस्त्रोद्योग, फुड व इतर उद्योगांसाठी सुधारित अभिन्यास मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश उद्योग मंत्री देसाई यांनी दिले.