शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध : मंत्री छगन भुजबळ
नाशिक : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असून नागरिकांच्या सर्व प्रश्नांना न्याय देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांच्या वीजेच्या प्रश्नांवर मार्ग काढला जाईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला तालुक्यातील सत्यगाव जनसुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, आदिवासी वस्तीमधील सभामंडप व २२३६ पोषण आहार योजनेतील अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन तर सताळी येथे मूलभूत सुविधा अंतर्गत साईबाबा मंदिर सभामंडपाचे उद्घाटन करण्यात करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर,तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, वसंत पवार, मोहन शेलार, अनिता काळे, बाळासाहेब गुंड, विश्वासराव आहेर, साहेबराव आहेर, विनोद जोशी, भाऊसाहेब बोचरे, प्रकाश वाघ, ज्ञानेश्वर शेवाळे,प्रा अर्जुन कोकाटे, सरपंच नानासाहेब सांगळे, साहेबराव सांगळे, उपसरपंच सुनील सांगळे, सुधीर सांगळे, वाल्मिक सांगळे, साताळीचे सरपंच सुनंदा काळे ,भाऊसाहेब कळसकर,तुळशीराम कोकाटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांना वीजेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल.शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याबरोबरच वीज देखील खंडित होणार नाही याची काळजी घेतली जाईल. विजबिलाच्या भरणातून आलेला निधी हा गावातील वीजेची कामे मार्गी लावण्यासाठी परत मिळणार आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या विकास कामांचा उपयोग करून घेण्यात यावा. कोरोना आपल्याला न परवडणारा असून अधिक वाढल्यास सर्वसमान्यांच्या रोजीरोटीवर देखील गदा येते. यासाठी आपण काळजी घ्यावी.कोरोनाच्या प्रादुर्भाव झाल्याने शासनाचा सर्वाधिक निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात आता एक हजार कोटी पेक्षा अधिकचा आराखडा शासनास सादर करण्यात येत असून यातून अधिक विकासाची कामे होतील.
गेल्या काही वर्षात रस्त्याची कामे रखडली आहे. या कामांचा बॅकलोक भरून काढण्यात येईल. पाणी पुरवठा योजनांमधील वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे वीजेचा प्रश्न कायमचा सुटणार असून योजनेचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे योजना यशस्वीपणे सुरू राहण्यास मदत होईल, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.