महाराष्ट्राचा हरियाणात विजयी जल्लोष
पंचकुला : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या कबड्डी, मल्लखांब, कुस्ती, जिम्नॅस्टिक , बॅडमिंटन, सायकलिंग आदी संघांनी चांगली कामगिरी केली आहे. काही खेळाडूंनी बुधवारी बारावीच्या निकालातही आपली छाप पाडली. प्रत्येक विजयानंतर हरियाणाचे मैदान विजयी जल्लोषाने दुमदुमून जात आहे.
सांघिक विजयानंतर विजयाचा जल्लोश केला जात आहे. अॅथलेटिक्समध्ये मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविल्यानंतर जल्लोषात खेळाडूंसह क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, मुख्य व्यवस्थापक अरूण पाटील, अॅथलेटिक्सचे प्रशिक्षक महेश पाटील, जयकुमार टेंबरे, खेळाडू यांच्यासह पालकही सहभागी झाले.
यांनी गाजवले बारावीचे मैदान
दरम्यान खेळासोबतच बारावीच्या निकालातही या खेळाडूंनी आपली छाप पाडली. आयएससी पॅटर्नमधून शिकत असलेल्या आर्यन कदम याला बारावी परीक्षेच्या पहिल्या सत्रात ८२ टक्के गुण मिळाले. तर बुधवारी बारावी परीक्षेच्या निकालात आर्यन पाटील (५६ टक्के, पनवेल) आणि सार्थक शेलार (५० टक्के, कोल्हापूर) यांनीही चांगले गुण घेतले. तर आर्यन कदमने ४ बाय १०० रिलेमध्ये सुवर्ण आणि २०० मीटरमध्येही सुवर्ण कामगिरी केली आहे. आर्यन पाटीलला उंच उडीत रौप्य मिळाले. सार्थकला रिलेमध्ये सुवर्ण पदक मिळाले. मुलींच्या संघातील वाणिज्य शाखेतील वैष्णवी कातुरे मैदान गाजवताना ६८.३३ टक्के गुण मिळवले. कॉम्प्युटर सायन्सला असलेल्या रिया पाटील ७५.१७ टक्के गुण मिळाले.