महाराष्ट्राच्या ‘क्रांती गाथा दालन’ व ‘जलभूषण’ या वास्तू नव्या पिढीला प्रेरणादायी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुंबई : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे ‘क्रांती गाथा’ हे भूमिगत दालन व जलभूषण सारखी नवीन वास्तू देशाला प्रेरणा देणारी ठरेल, असे उद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.
राजभवन येथे ‘क्रांती गाथा’ भूमिगत दालन व राज्यपालांच्या ‘जलभूषण’ निवासस्थानाच्या उदघाटन पर कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, ‘क्रांती गाथा’ भूमिगत दालन व जलभूषण ही नवी वास्तू हे दोन्हीही देशासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. राज्यपाल यांनी म्हटंल्याप्रमाणे ‘राजभवन’ हे लोकभवन म्हणून नावारूपास येईल. आज आपण एका चांगल्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहोत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. यापूर्वीही मी अनेकदा राजभवनात आलो आहे. राजभवनाचे हे बदलले रूप निश्चितच सर्वांना प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे शौर्य स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारे आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीने अनेक देशांना प्रेरित केले. संत तुकाराम ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांनी घडलेल्या महाराष्ट्राचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. मुंबई तर स्वप्नांचे शहर आहे.
मात्र महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत जी 21 व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्रे बनतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. याच विचाराने एकीकडे मुंबईच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केले जात आहे आणि त्याच वेळी इतर शहरांमध्ये देखील आधुनिक सुविधांमध्ये वाढ केली जात आहे असे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्राला माझे आग्रहाचे सांगणे आहे की नव्या पिढीला आपला इतिहास माहिती झाला पाहिजे. आपण सहलीसाठी अनेक ठिकाणी मुलांना घेवून जातो मात्र अंदमान निकोबारचा तुरूंगही विद्यार्थ्यांना दाखविला जावा, जेणेकरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बलिदान माहिती होईल. गेल्या 60 -70 वर्षांपासून राजभवनच्या खाली बंकर होता पण कुणालाच माहीत नव्हते. आज या वास्तू निश्चित सर्वांना माहिती होतील असाही विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
राजभवन हे लोकभवन बनेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, राजभवनात साकारलेले ‘क्रांती गाथा’ भूमिगत दालन व ‘जलभूषण’ निवासस्थान हे राज्याला प्रेरणा देणारे ठरेल. यावेळी राज्यपालांनी राज्यात शिक्षण क्षेत्रातही आपण नविन उपक्रम राबवित असल्याचे यावेळी सांगितले. राजभवन हे लोकभवन म्हणून यापुढे सर्वांना परिचित होईल. राजभवन च्या माध्यमातून लोकांना महाराष्ट्र कळण्यास मदत होईल.