महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात या वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम सुरू होणार : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक : जिल्ह्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यासाठी एकूण सात विषयांना शासनस्तरावर मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षात अनुभवी व तज्ञ शिक्षकांची निवड करून आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे या वर्षापासून पदुव्यत्तर अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयतील नियोजन भवन येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाब आयोजित आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, या अभ्यासक्रमातंर्गत औषध वैद्यक शास्त्र 12, बालरोग चिकित्सा शास्त्र 06, शल्य चिकित्सा शास्त्र 12, अस्थिरोग शास्त्र 06, भुल शास्त्र 14, स्त्रीरोग चिकित्सा व प्रस्तुती शास्त्र 06, अपत्कालीन औषध वैद्यकशास्त्र 03 अशा एकुण 59 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी एकुण 49 अनुभवी अधिष्ठाता व विशेषतज्ञांची नेमणूक करण्यासाठी जाहिरात देण्यात आली असून, 27 ते 31 जानेवारी 2022 या दरम्यान मुलाखत घेवून निवड करण्यात येणार आहे.
सदरचा प्रकल्प हा 670 कोटी रूपयांचा असून, विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीच्या कामकाजाबाबत आवश्यक सर्व प्रमाणपत्र, सामंजस्य करार व इतर महत्वपूर्ण बाबींची पूर्तता करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत इमारत बांधकाम संदर्भात प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास शासनस्तरावर मान्यता मिळण्यासाठी मी स्वत: लक्ष घालणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे बांधकाम करतांना अनुभवी तज्ज्ञ वास्तु विशारदाची नेमणूक करुन त्यांच्यामार्फत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने उत्कृष्ट प्रतिचे बांधकाम करावे. तसेच नव्याने तयार होणारे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम व इतर आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासल्यास शासनस्तरावर आवश्यक ती सर्व मदत व वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिली आहे.
कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी यावेळी बैठकीत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाचा 60 टक्के व आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचा 40 टक्के निधी यातत्वावर काम करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी पालकमंत्री भुजबळ यांना सादर केली आहे.