महाप्रित ही कंपनी शासनाच्या इतर महामंडळास प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
मुंबई : महाप्रित ही महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची सहयोगी कंपनी असून या कंपनी अंतर्गत अनेक प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. सौर ऊर्जेसह विविध उत्पादन क्षमतेच्या प्रकल्पांच्या माध्यमातून ही कंपनी इतर महामंडळांना प्रेरणादायी ठरेल असे काम होणे अपेक्षित असल्याची अपेक्षा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.महाप्रीत कंपनीची आढावा बैठक आज मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कंपनीमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांबाबत महाप्रित कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी मंत्री महोदयांना माहिती दिली. प्रामुख्याने महाप्रितने जे प्रकल्प हाती घेतले आहेत त्यामधील सौर ऊर्जा प्रकल्प सांगली व बीड सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रीक वाहन व चार्जींग स्टेशन प्रकल्प, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क व डेटा सेंटर प्रकल्प मौजे जांभूळ, महादीप, कृषी मुल्य साखळी, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अंतर्गत बायोगॅस व जौविक खते प्रकल्प, MAIF, NBR Portal, AIGEP प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती व हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठीचे नियोजन याबाबतच्या कालबध्द कार्यक्रमाची सविस्तर माहिती मंत्री महोदयांना दिली.मंत्री धनंजय मुंडे यांनी महाप्रितच्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करुन हे प्रकल्प अधिक गतिमानतेने पूर्ण करावेत असा मनोदय व्यक्त केला. या प्रकल्पांतर्गतचे लाभ थेट मागासवर्गीयांना होणार असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चित मदत होणार आहे. याबाबत शासकीय पातळीवर आवश्यक असणाऱ्या बाबी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही मा.मंत्री महोदयांनी आश्वस्त केले.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या असणाऱ्या भागभांडवलाबाबत तसेच अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधाबाबत सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांच्या स्तरावर त्वरीत कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी नमुद केले.महाप्रितच्या पुढील वाटचालींसाठी त्यांनी महत्वपूर्ण सुचना केल्या. महाप्रित ही कंपनी शासनाच्या इतर महामंडळास एक प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.या बैठकीस महाप्रित या कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक. बिपीन श्रीमाळी तसेच विजय कळाम पाटील, डायरेक्टर ऑपरेशन्स, प्रशांत गेडाम, कार्यकारी संचालक, रविंद्र चव्हाण, कार्यकारी संचालक (ट्रांन्समिशन), सुरेश रामचंदानी, प्रोजेक्ट डॉरेक्टर (इंफ्रास्ट्रकचर), सुभाष नागे, मुख्य महाव्यवस्थापक (एस.टी.पी) सतीष चावरे, मुख्य महाव्यवस्थापक (रीम) ए.बी.सोनी, मुख्य महाव्यवस्थापक (स्टार्टअप) गणेश चौधरी, मुख्य महाव्यवस्थापक (डब्लू.इ.सी), विजय माहूलकर इतर अधिकारी उपस्थित होते.