हनुमान जन्मोत्सवानिमित्त ढुम्या डोंगरावर महाभिषेक, प्रवचन, महाप्रसाद
खेड : करोना महामारीमुळे गेली दोन वर्षे हनुमान जयंती उत्सवाला ‘ब्रेक’ लागला असला तरी निर्बंध उठल्याने यंदा सर्वदूर हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ढुम्या गिरीभ्रमण मंडळाच्या वतीने यावर्षी ढुम्या मारूती मंदिर परिसरात जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. राजगुरुनगर शहराजवळील चांडोली-वडगाव पाटोळे गावच्या हद्दीवरील ढुम्या डोंगरावर शनिवारी (दि. १६) जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे.
ढुम्या गिरीभ्रमण मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटे चार ते साडेचार वाजता महाभिषेक, पाच वाजता ह.भ.प. अशोक महाराज सांडभोर यांचे ‘हनुमान जन्म’ या विषयावर प्रवचन होणार आहे. तसेच सकाळी सव्वासहाच्या सुमारास हनुमान जन्मोत्सवास प्रारंभ होईल. सकाळी सातनंतर भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.
निसर्गरम्य वातावरणात साजरा होणा-या हनुमान जन्मोत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी सहभागी होवून अन्नप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ढुम्या गिरीभ्रमण मंडळातर्फे करण्यात आले आहे.