खेडमध्ये अवकाळीमुळे दोन कोटींचे नुकसान
तालुक्यातील 5170 शेतकऱ्यांच्या 1685.61 हेक्टरवरील पिकांना फटका
खेड : तालुक्यात 1 डिसेंबरच्या अवकाळी पावसाचा 5170 शेतकऱ्यांच्या 1685. 61 हेक्टरवरील रब्बी हंगामातील पिकांसह, नगदी पिकांना फटका बसला. जवळपास 2 कोटींचे नुकसान झाल्याचे पिकांच्या पंचनाम्यातून समोर आला आहे. जवळपास शेती पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे आणि गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिली.
खेड तालुक्यातील 1 ते 3 डिसेंबरदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नगदी पिकांना बसला होता. तालुक्यात 61 गावांतील 1490 शेतकऱ्यांचे शेतीक्षेत्रावरील रब्बीतील 70 हेक्टर ज्वारीचे, 249 हेक्टर हरभरा, 91 हेक्टर इतर पिके मिळून 410 हेक्टर वरील पिकांचे 27 लाख 88 हजारांचे नुकसान झाले.
बागायती पिकांमध्ये 129 गावांतील 3680 शेतकऱ्यांचे सर्वाधिक 1247 हेक्टर क्षेत्रातील कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले.
बटाटा 7 हेक्टर, भाजीपाला 17 हेक्टर, मका 4 हेक्टर इतर पिके 0.61 हेक्टर असे एकूण 1275.61 हेक्टर क्षेत्रातील 1 कोटी 72 लाख 20 हजार 735 रुपयांचे पिकांना फटका बसला असा पंचनामा करण्यात आला आहे. पावसात फळबागा पिकांची हानी झाली नसल्याचे समोर आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मादंळे यांनी दिली.