मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
मुंबई। सह्याद्री लाइव्ह। मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येईल. आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतून उत्कृष्ट ठरणारा लोगो आणि पोस्टरची अंतिम निवड करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाडयात शासकीय सांस्कृतिक उपक्रम आयोजित करणे तसेच सांस्कृतिक कार्य विभागातील विविध विषयांवरील बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, उपसचिव विद्या वाघमारे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामाला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या संग्रमाची माहिती सोप्या आणि सहज भाषेत लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मराठवाडा सांस्कृतिक महोत्सव मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येईल. मराठवाड्यातील स्थानिक कलाकारांना यामध्ये प्रामुख्याने समावेश असेल. याशिवाय मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास उलगडून हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशेष गीत तयार करण्यात येईल.
सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत यावर्षी ६ महसूली ठिकाणी विभागीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र हा महोत्सव विभागीय स्तरावर ना करता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘ महासंस्कृती महोत्सव‘ आयोजित करण्यात येईल असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
नाट्यगृह अद्ययावत करणार ; हौशी रंगभूमी ला बळ देणार!
नाट्य चळवळ सुरू राहावे याकरिता राज्यातील नाट्यगृह आधुनिक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करताना नाट्यगृहांमध्ये सोलर, एअर कंडीशन व्यवस्था, साऊंड सिस्टीम, नाट्यगृहाच्या खुर्च्या, मेकअप रूम, प्रकाश व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, पार्किंग या सगळया बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी मराठी सिनेमांना प्रोत्साहनामार्फत अनुदान देण्यात येते. हे अनुदान देताना सिनेमाचे स्क्रिनिंग तीन महिन्यात पूर्ण करण्यात येऊन याबाबत निर्णय घेण्यात यावा. तसेच काही वेगळे सिनेमा यांची निर्मिती त्या वर्षात केला असल्यास त्यांनाही यामध्ये समावेश करण्यात यावे. महाराष्ट्राच्या कलाकारांना विविध घटकांना एकत्र आणता येईल अशा कलासंकुलाची निर्मिती येणाऱ्या काळात करण्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे नियोजन असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
यापूर्वी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजेत्या ठरलेल्या सांघिक संघाला पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र यापुढे विजेत्या संघातील प्रत्येक कलावंतांस सहभाग घेतल्यबद्दल प्रमाणपत्र देण्यात यावे यासंदर्भात व नाट्य स्पर्धेचे, नाटकाचे परीक्षण करणाऱ्यांना देण्यात येणारे मानधन यामध्ये वाढ करण्याचा विचार शासनामार्फत करण्यात येईल असेही मुनगंटीवार म्हणाले.