पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या बापाला जन्मठेप !
राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
राजगुरूनगर । सह्याद्री लाइव्ह । अल्पवयीन असलेल्या पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम वडिलांना राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. १२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
खेड तालुक्यातील दुर्गम गावात ८ फेब्रुवारी २०१८ रोजी १३ वर्षीय मुलीवर वडिलांनी बलात्कार केला. नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली होती. खेड तालुक्यातील एका गावात नराधम वडील आई, दोन भाऊ आणि इयत्ता आठवीत शिकणारी पीडित मुलगी असा एकत्र परिवार राहत होता. आई आणि एक भाऊ बाहेरगावी गेले होते. त्यावेळी दारूच्या नशेत रात्री नराधम बापाने आपल्या मुलीसोबत अत्याचार केला होता.
लहान भावाशेजारी झोपलेल्या मुलीला लगतच्या खोलीत नेले. तिथे नराधम बापाने जीवे मारण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केला. मुलगी व आईच्या तक्रारीनंतर ११ फेब्रुवारीला आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो येरवडा तुरुंगात आहे.
राजगुरूनगर सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या कोर्टात हा खटला सुरू होता. सरकारी वकील व्ही. एन. देशपांडे यांनी पीडितेच्या बाजूने युक्तिवाद केला. या खटल्यात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित मुलगी, आई व डॉक्टर यांच्या महत्त्वाच्या साक्ष गृहीत धरली. आणि आरोपीला न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.