सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सामुहिकपणे प्रयत्न करूया – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
नागपूर : शहरातील मुस्लीम समाज हा समजूतदार असून या समाजाने सामंजस्य दाखवून सामाजिक सलोखा, शांतता कायम ठेवण्यास सहकार्य केले आहे. यापुढेही कोणत्याही भडकावू वक्तव्य, कृत्यांना थारा न देता शांती, अमन कायम ठेवण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. यशोधरानगर पोलीस स्टेशनच्यावतीने ताजमहाल सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित इफ्तार कार्यक्रमात ते बोलत होते.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक पोलीस आयुक्त नयन अलूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, अहमद शेख, मौलाना हसन इमानदार, अब्दुल मजीद, मोहम्मद अल्ताफ शेख, अकिल अहमद, मोहम्मद आरिफ हुमायू, शबाना बेगम यावेळी उपस्थित होते.
मुस्लीम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देवून पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो, मात्र धार्मिक उन्माद, दहशत निर्माण करणारी वक्तव्य टाळून सामाजिक शांतता कायम राखणे आवश्यक आहे. नागपूर शहरातील मुस्लीम समाजाने समजूतदारपणा दाखवत, योग्य भूमिका घेवून धर्माचा सन्मान करण्यासोबतच संविधानाचे पालन केले आहे. यापुढेही शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हा समाज पोलीस प्रशासनाला सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कायदा व सुव्यवस्था बिघडवून शहरात अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस सदैव सज्ज आहेत. सर्व समाज बांधवांनी अशा विचारांच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. धार्मिक सलोखा कायम राखण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी यावेळी सांगितले.
रमजानच्या पवित्र महिन्यात प्रेम आणि शांतीचा संदेश देण्यासाठी परिमंडळ क्र. 5 आणि यशोधरानगर पोलीस स्टेशनच्यावतीने या इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त पंडित यांनी यावेळी सांगितले.