माझा मराठवाडा, माझे नांदेड आणि माझा महाराष्ट्र या भूमिकेतून विकासाला न्याय देऊ – पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या विकासाची बांधिलकी ही राजकीय भूमिकेतून नाही तर आत्मीयतेतून स्विकारलेली आहे. स्व. शंकरराव चव्हाण यांनीही हाच बाणा आयुष्यभर जपून तो वारसा आमच्याकडे दिला आहे. त्यांनी जी दूरदृष्टी आणि जो पाया नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी रचला त्या पायावर नांदेड जिल्ह्यासह नांदेडला महानगराचे वैभव विविध विकास कामांच्या माध्यमातून आणू असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांच्यावतीने शहर रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत विविध विकास कामांचे प्रातिनिधीक भूमिपूजन आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
ओम मंगल कार्यालय कौठा येथे आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. जयश्री पावडे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, मनपा सभापती संगिता डक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले आदींची उपस्थिती होती.
नांदेड महानगर शैक्षणिक हब म्हणून नावारुपास आले आहे. आरोग्य सेवा-सुविधेचे हब म्हणूनही नांदेड महानगर विकसीत झाले आहे. या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर सेवा-सुविधा लक्षात घेता आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर आपण इतर महानगराच्या तुलनेत कुठेही कमी नाही आहोत. या महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असून विकास कामांसाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
कुठल्याही शहराची ओळख ही तेथील रस्त्यावरून होत असते. ज्या शहरातील रस्ते चांगले असतात तेथे विकासही चांगला होतो, ही बाब लक्षात घेवून नांदेड शहरात सहा पदरी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. नांदेड शहरातील डॉ. शंकराराव चव्हाण चौक-माळटेकडी गुरूव्दारा-नमस्कार चौक-एमजीएम कॉलेज संरक्षण भिंत-महाराणा प्रताप चौक-बाफना टी पॉईंट या रस्त्याचा विकासात अंर्तभाव आहे. याचबरोबर बसस्थानक-रेल्वेस्टेशन ते बाफना टी पॉईंट पर्यंत रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजकासह संगमस्थळांची सुधारणा या पहिल्या टप्पयातील कामाची सुरुवात केली. ही सर्व विकास कामे तीन टप्प्यामध्ये पूर्ण करुन नांदेडचा कायापालट करू, असे त्यांनी सांगितले.
या कामामुळे वाहतुक व्यवस्थेवरील ताण कमी होणार असून यामुळे शहराचा विकास जलगतीने होणार आहे. ही सर्व कामे तातडीने आणि जलद गतीने येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. रस्ते तयार करताना सांडपाणी, वाहुन नेणाऱ्या पाईपाईलनची उत्तम व्यवस्था तयार करण्यात येणार आहे.