इंदापूरच्या सर्व निवडणुका जिंकून गतवैभव आणू
हर्षवर्धन पाटील : केंद्राच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेला मदत मिळवू
इंदापूर : इंदापूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या बिनविरोध निवडणुकीतून स्पष्ट झाली आहे. विधानसभा निवडणूक आपल्या हातून अल्पशा मताने गेली. मात्र, आता आगामी काळात तालुक्यात होणाऱ्या सर्वच निवडणुका जिंकून इंदापूर तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देऊ, अशी ग्वाही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर येथे जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आप्पासाहेब जगदाळे यांचा हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील विविध संस्था, ग्रामपंचायती, विकास सोसायट्या, कार्यकर्ते यांनी संचालकपदी बिनविरोध निवडीबद्दल आप्पासाहेब जगदाळे यांचा सत्कार केला. पाटील म्हणाले, आपण विरोधी पक्षात असूनही बॅंकेची निवडणूक बिनविरोध झाली हे महत्वाचे आहे. जिल्हा बॅंकेच्या बिनविरोध निवडीसाठी वरिष्ठांची आपण चर्चा केली.
जरी निवडणूक लागली असती तरी आपला एकतर्फी विजय निश्चित होता. जगदाळे यांनी गेली 19 वर्षे बॅंकेचा कारभार चांगल्या पद्धतीने केला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे धोरण आहे. त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून पुणे बॅंकेस ही केंद्राकडून धोरणात्मक निर्णयांसंदर्भात सहकार्य करता येईल. आता तालुक्यातील होणाऱ्या 54 विकास सोसायट्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. या निवडणुकांसाठी आम्ही, आप्पासाहेब, जाचकबापू कार्यकर्त्यांना मदत करणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले.
जगदाळे म्हणाले की, आता अधिक जोमाने आपण सर्वांना कामाला लागावे लागणार आहे. झालेल्या चुका विसरून जाऊन आगामी सर्व निवडणुकांत आपण 100 टक्के विजय मिळवू. बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल जगदाळे यांनी आभार मानले. बॅंक निवडणुकीत उर्वरित जागांसाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, आशाताई बुचके, दादासाहेब फराटे हे उमेदवार रिंगणात असल्यामुळे आपणास त्यांना मतदान करावे लागणार आहे, असेही जगदाळे यांनी नमूद केले.
इंदापूर भाजपचे तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती वनवे, मयुरसिंह पाटील, ऍड. कृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, तानाजी थोरात, बाळासाहेब डोंबाळे-पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.