भारत-इराण मैत्रीसंबंध आणखी दृढ व्हावेत यासाठी कायदेमंडळांनी पुढाकार घ्यावा…
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । भारत आणि इराण या दोन देशांमध्ये पूर्वापार मैत्रीसंबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये कृषी, व्यापार, सुक्ष्म तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, खनिकर्म या क्षेत्रामध्ये व्यापारवृद्धीसाठी अपार संधी आहेत. दोन्ही देशांच्या कायदेमंडळांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन हे संबंध आणखी दृढ करावेत अशी अपेक्षा इराण संसदेच्या सदस्या डॉ. फातेमा घसेमपूर आणि डॉ. मोसूमेह बहराम यांनी व्यक्त केली. इराण संसदेच्या शिष्टमंडळाने आज विधानमंडळाला सदिच्छा भेट दिली.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा इंग्रजी भाषेतील चरित्रग्रंथ भेट देऊन सन्मान केला.
या महिला सदस्यांसमवेत इराणचे भारतातील राजदूत डॉ. अली चेगेनी, मुंबईतील इराणचे उच्चायुक्त ए. एम. अलिखानी, इराणचे मुंबईतील व्यापार व वाणिज्य विभागाचे उच्चायुक्त सय्यद मोहम्मद मिराई आणि महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत हे देखील यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी भारतीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानमंडळाच्या गौरवशाली योगदानाची माहिती दिली. महिला सबलीकरण आणि विकासासंदर्भात महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या योजना, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला प्रतिनिधींसाठी ठेवण्यात आलेले आरक्षण, महिलांचा राजकीय सहभाग, महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांना उजाळा देत त्यांनी दोन्हीकडील लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या अभ्यासगटांच्या भेटी आयोजित केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
इराणमध्ये महिलांना आम्ही केवळ कुटुंबातील महत्त्वाचा नव्हे तर अर्थकारणातील महत्त्वाचा घटक मानत आहोत. व्यापारउदीमामध्ये इराणमध्ये महिलांनी मोठी आघाडी घेतली आहे. दोन्ही देशातील महिलांच्या यशोगाथा प्रत्यक्ष भेटीगाठीद्वारे तसेच समाजमाध्यमांद्वारे मांडल्या जाव्यात ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, दोन्हीकडील कायदेमंडळांनी यासंदर्भात पुढाकार घ्यावा, असे मत इराणच्या महिला संसद सदस्या तसेच वाणिज्यदूतांनी यावेळी व्यक्त केले.