विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून कोल्हापुरात श्रीअंबाबाई मंदिर पाहणी व दर्शन
कोल्हापूर : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच मंदिरात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेतला.श्री अंबाबाई मंदिरात सध्या सुरु असणाऱ्या संगमरवरी फरशी काढण्याच्या कामाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माहिती घेऊन या अनुषंगाने असणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. पिण्याचे पाणी व स्वच्छतेच्या समस्यांविषयीही त्यांनी जाणून घेतले. श्रीअंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
विकास आराखड्याच्या अनुषंगाने संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी करुन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याशी चर्चा केली. मंदिरातील अभिषेक पद्धती व पूजा विधी याबाबत माहिती जाणून घेतली. कोरोना परिस्थितीत लॉकडाऊन काळात मंदिरात केलेल्या उपाययोजना, सध्या सुरु असलेली विकास कामे या संदर्भातील माहिती व ऑनलाईन देणगी संदर्भात सुरु असणाऱ्या सुलभ प्रक्रियाबाबत सचिव श्री नाईकवाडे यांनी माहिती दिली.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मंदिरासाठी देणगी दिली. तसेच देवीला महावस्त्र अर्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या. देवस्थान समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या देवस्थान सेवा योजनेमध्ये सहभागी होण्याची इच्छा डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबत मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्यासाठी पाठपुरावा करु, असेही त्यांनी सांगितले.
करवीर तहसीलदार शीतल मुळे- भामरे, पन्हाळा नायब तहसीलदार विनय कौलवकर, देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, आदी यावेळी उपस्थित होते.