म्हाडाच्या अडीच हजारांसाठी लवकरच सोडत
पुणे – शासनाच्या धोरणानुसार 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत (इंटिग्रेटेड हाऊसिंग) 1 हजार 80 अत्यल्प व अल्प उत्पन्न गट सदनिका तसेच 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अंदाजे 1 हजार 592 अत्यल्प व अल्प उत्पन्न गट सदनिका अशा एकूण 2 हजार 672 सदनिका उपलब्ध झाल्या आहेत. या घरांसाठी म्हाडाकडून लवकरच सोडत होणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी दिली.
म्हाडामार्फत विविध उत्पन्न गटाअंतर्गत सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यातील अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील 5 हजार 183 पात्र कुटुंबाला हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ‘2022 पर्यंत सर्वांना हक्काचे घर’ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. घरे उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया संगणकीय असून पारदर्शक असल्याचे माने यांनी सांगितले.
खेड तालुक्यात म्हाळुंगे (इंगळे) येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील 648 व अल्प उत्पन्न गटातील 620 अशा एकूण 1 हजार 268 तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सर्व्हे क्रमांक-309 पिंपरी-वाघिरे येथे अल्प उत्पन्न गटातील 308, मध्यम उत्पन्न गटातील 595 आणि उच्च उत्पन्न गटातील 340 अशा एकूण 1 हजार 243 कुटुंबांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी सदनिकांची गृहनिर्माण योजना राबविण्यात आली होती. पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तळेगाव दाभाडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटाकरीता 762 सदनिकांची गृहनिर्माण योजना राबविण्यात येत असून योजनेचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे माने यांनी सांगितले.