जाणून घ्या : हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते?
सध्या दिवस बदलाचे आहेत. वातावरणासाठी, हवामानासाठीही हे लागू आहे. खरंतर एव्हाना गुलाबी थंडीची चाहूल लागायला हवी होती. पण अद्याप आपण कडक उन्हात होरपळतो आहोत. रात्री उशिरा आणि पहाटे थोडा गारवा जाणवतो. पण या बदलांचा सगळ्यात वाईट परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर. या बदलाच्या काळात आणि येणाऱ्या नव्या सीझनसाठी त्वचेला सगळ्यात जास्त आवश्यकता असेल ती ओलाव्याची. या काळात त्वचा कोरडी पडते, रुक्ष होते. पण त्वचा नक्की कोरडी का पडते हे तुम्हाला ठाऊक आहे का? याचसंदर्भात आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
त्वचा कोरडी का पडते?
आपली त्वचा हे एक संरक्षणात्मक कवच आहे. या कवचाचे अंत:त्वचा (डर्मिस) आणि बाह्यत्वचा (इपीडर्मिस) असे दोन भाग आहेत. बाह्यत्वचेमध्ये पेशींचे एकावर एक असे अनेक थर असतात. हे थर जिवाणू-विषाणू व इतर रोग संक्रमणासाठी सुरक्षाकवच म्हणून काम करतात. सर्वात आतील थर नियमितपणे नव्याने तयार होतो, बाहेरील थर मृत होतो. अंत:त्वचेमध्ये मेदाम्लांचा थर असतो, या थरात तैलग्रंथी [सेबॅशियस ग्लॅन्ड] आणि घर्म ग्रंथी [ स्वेट ग्लॅन्ड] असतात. तैलग्रंथीमध्ये सिबम स्रवले जाते, हे सिबम केसांच्या बीजकोषाला तेल पुरवते. या केसाच्या बीजकोषातून केसाची निर्मिती होते, केस आणि तेल/सिबम ग्रंथीच्या नलिकेतून त्वचेवर येतात. त्यामुळे त्वचा मऊ राहते. घर्मग्रंथीमध्ये घाम स्रवला जातो, घामामध्ये युरिया,अमिनो आम्ले, पाणी, उष्णता असते, त्यामुळे शरीरातील तापमान व क्षार नियमनाचे काम सुरळीतपणे सुरू असते.
थंडीमध्ये त्वचेतील सर्वात बाहेरील पेशींचा थर मृत होतो आणि झडून जातो, त्वचेला रखरखीतपणा येतो, यास आपण त्वचा फुटली असे म्हणतो. तसेच वातावरणातील तापमान व हवेतील आद्र्रता कमी झाल्यामुळे त्वचेमधून ओलसरपणा बाहेर टाकला जातो, तैलग्रंथींचे कार्य मंदावते आणि त्वचेला कोरडेपणा येतो, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.