‘लोकशाही वारी’ दिंडीचा शुभारंभ
पुणे : आषाढी पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर युवक व खेळ, मंत्रालय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुख्य निवडणूक अधिकारी, राष्टीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी, निर्मल वारी-हरित वारी-लोकशाही वारी’ दिंडीचा कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येत असून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये ही दिंडी सहभागी होत आहे. दिंडीच्या शुभारंभप्रसंगी यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालीनी सावंत, प्र. कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, प्र. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. काळे म्हणाले, या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले येणार आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात या दिंडीमध्ये तरुण विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून त्यामध्ये सामाजिक नेतृत्व विकसित होत आहे. भारताचा तरुण जागतिक पातळीवर एक आदर्श तरुण ठरावा, देशाच्या तरुणाने सामाजिक आदर्श जोपासावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उपजिल्हाधिकारी सावंत म्हणाल्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने दरवर्षी ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी, निर्मल वारी-हरित वारी’ दिंडीचे आयोजन करण्यात येते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने या वर्षीपासून ‘लोकशाही वारी’ दिंडी पंढरपूरपर्यंत सहभागी झाली आहे. लोकशाहीच्या मूल्यांचे महत्त्व या दिंडीतून जनतेमध्ये बिंबवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पांडे आणि डॉ. चाकणे यांनीदेखील विचार व्यक्त केले.
‘वारी पंढरीची वारी लोकशाहीची‘ चित्ररथाचा शुभारंभ
आषाढी वारीमध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत ‘वारी पंढरीची वारी लोकशाहीची’ या निवडणूकविषयक जनजागृती करणाऱ्या चित्ररथाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून शुभारंभ करण्यात आला. चित्ररथाच्या माध्यमातून पालखीमार्गावरील गावागावात मतदान नोंदणी विषयक जनजागृती केली जाणार आहे. स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी दिंडीचे स्वागत करणार आहेत. या दिंडीसोबत राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले असून पथनाट्याचे सादरीकरण करुन जनजागृती करणार आहेत.