सातबाऱ्यासंदर्भातल्या महत्वाच्या शासकिय कामांसाठी भूमी अभिलेख विभागाची ‘ई-हक्क’ प्रणाली
ऑनलाईन अर्जामुळे सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाही
पुणे । सह्याद्री लाइव्ह । सातबारा उताऱ्यासंदर्भातील शासकिय कामांसाठी तलाठ्याकडे लोकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात. ही कामे सहजसोपी व्हावी, या कामांसाठी सरकारी दफ्तरांमध्ये हेलपाटे मारावे लागू नये यासाठी भूमी अभिलेख विभागाने ‘ई-हक्क’ प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे सातबाऱ्यासंदर्भातल्या महत्वाच्या कामांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत या प्रणालीमार्फत दोन कोटींपेक्षा जास्त फेरफार नोंदविले गेले आहेत. या फेरफारांपैकी केवळ साडेसव्वीस लाख फेरफार नोंदी या नोंदणीकृत दस्तांच्या आधारे झाल्या आहेत.
कोणकोणती कामे होणार ऑनलाईन?
सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे, ई-करार नोंदणी करणे, विश्वस्थांचे नाव बदलणे, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, एकत्र कुटूंब करत्याची नोंद कमी करणे त्याचबरोबर सातबारा उताऱ्यावरील चुका दुरुस्त करण्याची कामे या प्रणालीमार्फत करता येत आहेत.
अर्ज कसा करावा?
वरील नमूद कोणतेही काम करण्यासाठी अर्जदार ‘ई-हक्क’ प्रणालीच्या https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. त्यासाठी कुठल्याही सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडून फेरफार अर्जाची माहिती भरावी. त्यानंतर हा अर्ज तलाठ्यांकडे मंजूरीसाठी त्यांच्या लॉगिनमध्ये दिसेल. तलाठ्यांच्या मंजूरी नंतर फेरफार बदल करण्यात येईल.
मोबाईलवर मिळणार अर्जाची संपूर्ण माहिती
अर्जदाराने फेरफारासाठी अर्ज केल्यानंतर अर्ज क्रमांकासोबत त्या अर्जाची संपूर्ण माहिती नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे मिळणार आहे. अर्जाची स्वीकृती, त्यातील त्रुटी, आणि त्याची प्रगती अशी सर्व माहिती एसएमएसद्वारे मिळाल्यामुळे कामाची माहिती घेण्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाही.
विशेष बातम्या पाहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES