#Blogs : Ladakh Diary – पृथ्वीवरचा स्वर्ग : लेह-लडाख
भाग १
@Rohidas Hole
लेह-लडाख. जगातील एक अद्भूत भटकंती. पर्यटकांसाठी अविस्मरणीय स्थळ. चित्र-विचित्र भूरूपे, बर्फाच्छिादित पर्वतशिखरे, स्फटिकासारखे साफ थंडगार पाणी, पहाडी संस्कृतीचा अनुभव. हे एवढंच नाही तर खूप सारं. लोकप्रिय पर्यटनस्थळ. मॉनेस्ट्रीज, गिर्यारोहकांचे नंदनवन. निसर्गाचे विविधांगी दर्शन अशी वैविध्यपूर्ण भटकंती खरं तर प्रत्येकानेच अनुभवायला हवी. वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक प्रवास, लष्करी तळ आणि आपले जवान किती खडतर परिस्थितीत कार्यरत असतात हे पाहून सार्थ अभिमान वाटतो. हे सारं जेव्हा आपण प्रत्यक्षात पाहतो. अनुभवतो. तेव्हा त्यातील रोमांच कळतो. हिमालयाची बर्फाच्छादित पर्वतशिखरे, मध्येच सखल भूमीत दिसणारे नद्यांचे खळाळणारे प्रवाह, त्या भोवतालची हिरवाई, पारदर्शी निळे पाणी, तलाव, सरोवर, खोल दऱ्या असा नजारा पाहताना आपण एका वेगळ्याच विश्वाला गवसणी घालतो. मग वाट कसली पाहताय चला लेह-लडाख पाहूयात…
राजगुरुनगर (पुणे-महाराष्ट्र) ते लेह २,३३८ किलोमीटर. मात्र ठरल्याप्रमाणे स्वत: मी, विशाल राक्षे, अमित कडलग, संदीप (बाळा) होले, विकास सांडभोर, मारूती घुमटकर, संदीप मिरजे, गुलाबराव नेहरकर, सोपान राक्षे असे आम्ही नऊ जण पुणे विमानतळाहून नवी दिल्ली पोहोचलो. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लेह (लडाख) असा ९९८ किलोमीटर ‘यादगार’ हवाई प्रवास केला. लेहमधील कुशोक बकुला रेम्पॉची विमानतळावर पोहचण्यापूर्वीच विमानात लेहमधील वातावरण आणि हवेतील ऑक्सिजनच्या पातळीचा कल्पना मिळाली होती. आम्हाला पुढचे किमान २४ तास तरी वातावरणाशी जुळवून घ्यावं लागणार होतं याचा चांगलाच अंदाज आला.
पुढचे दहा दिवस आम्ही हिमालयाच्या पर्वतरांगामधील भटकंतीचा ‘प्लॅन’ ठरलेला. दररोज कुठे आणि कधी निघायचे असं पक्कं नियोजन ठरलेलं. त्यानुसार दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे संगम पॉईंट, मॅग्नॅटिक हिल, गुरूद्वारा, हॅलो फेम, शांती स्तूप, लेह पॅलेस, कालीमाता मंदिर, सिंधू घाट (सध्या घाटचे सुशोभिकरण सुरू असल्याने पाहायला मिळाले नाही), रँचो स्कूल असा लेह शहराच्या परिसरातील प्रमुख पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. उन्हाचा तडाखा असला तरी आनंद अविस्मरणीय होता.
लेह पॅलेस…
सोळाव्या शतकात लेहचे राजे सेंगे नामग्याल यांनी बांधलेला हा राजवाडा राज परिवाराचे निवासस्थान म्हणून ओळखला जात असे. नऊ मजली उंची असलेला हा राजवाडा लेह शहरामधील सर्वात उंच इमारतींपैकी एक. तिबेटीय वास्तुकलेचा अविष्कार येथे पाहायला मिळतो. बौद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणारी अत्यंत सुबक चित्रकला भिंतीवर साकारलेली पाहायला मिळते.
शांती स्तूप…
लेहपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेला शांती स्तूप प्रेक्षणीय आणि धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. जपानी बौद्ध भिख्खू ग्यामयो नाकामुरा यांनी १९९१ साली शांती स्तूपाचे बांधकाम केले. पांढऱ्या रंगाचा व गोल घुमटाकार छत असलेला हा स्तूप पर्यटकांचे लक्ष वेधतो. विशेष म्हणजे या शांती स्तूप येथून लेह शहराचे विलोभनीय दृश्य दिसते. हे दृश्य पाहण्याची मजा काही औरच…
मॅग्नेटिक हिल
लेह-श्रीनगर महामार्गावर असलेले हे ठिकाण उंच-सखल भूपृष्ठ असलेले आहे. लेहपासून अवघ्या २६ किलोमीटर अंतरावर आहे. उताराच्या दिशेने गियर न टाकता (न्यूट्रल) उभी केलेली मोटार चढाच्या दिशेने जात असल्याचे दिसते. ही चमत्कारीत वाटणारी ही घटना पाहण्यासाठी पर्यटक ‘मॅग्नेटिक पॉइंट’वर गर्दी करताना दिसतात.
गुरूद्वारा पत्थरसाहिब…
गुरुद्वारा पत्थरसाहिब हे धार्मिक स्थळ लेह-श्रीनगर महामार्गावर आहे. शिखांबरोबरच सर्व धर्मीयांसाठी खुले असते. हा गुरुद्वार भारतीय सैन्याच्या देखरेखीखाली चालतो. या ठिकाणी मन:शांतीची अनुभूती मिळते.
हॅलो फेम (Hall Fame)
लेह आणि लडाखचा राजांचा इतिहास सांगणारे तसेच लढायांमधील शस्त्र, अवशेष असे प्रदर्शनस्वरूपात मांडण्यात आले आहे. याशिवाय बर्फाच्छादित भागात पूर्वीच्या राजे महाराजांची युद्धनीती पूर्वीचे शस्त्रसाठा याविषयावर माहिती देण्यात आली. सध्याचा स्थिती सांगणारे फलक आणि नकाशातून दृष्टिस पडत होते.
हेमिस मोनेस्टरी
लेह शहरापासून ४५ कि.मी. अंतरावर असलेला हेमिस हा मठ लडाख प्रांतातील श्रीमंत मठ मानला जातो. अकराव्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या या मठाची १६६२ मध्ये पुन्हा बांधणी करण्यात आली. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला हेमिस फेस्टिवल भरते. स्थानिक कलाकार संगीत वाजवतात, तर बौद्ध भिख्खू पौराणिक मुखवटे घालून नृत्य करतात.
‘लडाख’वारी करताय मग हे नक्की वाचा…
ऑक्सिजनची पातळी होते कमी…
विमानातून प्रवास करून आल्यावर लगेच पहिल्या दिवशी लेहला गेल्यास तुम्हाला कमी ऑक्सीजनचा खूप त्रास होते. लेहमध्ये सामान्यपेक्षा ऑक्सीजन कमी आहे आणि वर चढल्यावर ती आणखी कमी होऊ लागते. त्यामुळे लेह शहरात दोन दिवस आधी मुक्काम करा नंतर दोन-तीन दिवसांनंतर नुब्रा, चांगला पास, खारदुंगला पास, पैंगॉग लेक याठिकाणी जाण्याचे नियोजन करा. तुम्ही हे केले नाही तर उच्च उंचीवर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही उंचीवर गेलात आणि तुम्हाला श्वास घेण्यात अडचण येत असेल तर लगेच ५००-७०० मीटर खाली या. खारदुंगला सारख्या ठिकाणी ऑक्सिजन ५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे तिथे जास्त वेळ थांबू नका.
1 Comment
[…] #Blogs : Ladakh Diary – पृथ्वीवरचा स्वर्ग : लेह-लडाख […]