बीडच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई | सह्याद्री लाइव्ह | शहरी विकास योजनांसाठी राज्य शासनाने पाठविलेल्या १२ हजार ९०० कोटींच्या प्रस्तावास केंद्र सरकारने मंजूरी दिली असून नगरोत्थान योजनेंतर्गत बीडच्या विकासकामांसाठी भविष्यात निधीची कमतरता जाणवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम टप्पा दोनचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, एकंदरीतच बीडसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी भरीव निधी राज्य शासनाकडून देण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान, अमृत योजनांसाठी केंद्र सरकारकडून भरघोस निधी मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी १२ हजार ९०० कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यातून शहरे, महानगरांच्या मुलभूत सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील लाखो हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्यासाठी सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात येत आहे. त्याचबरोबर पश्चिम वाहिन्यांमधील वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकास कामांसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीचा प्रशासनाने सदुपयोग करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विकास कामांमुळे बीडचा कायापालट होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, बीड शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील १६ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर टप्पा २ अंतर्गत मंजूर कामांचा शुभारंभ आज झाला आहे. या सर्व विकास कामांमुळे बीड शहराचा कायापालट होणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना व घरकुल योजना यामुळे शहराला आधुनिकता प्राप्त होईल. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला स्वच्छ भारत अभियान दुसरा टप्पा आणि अमृत मिशन टप्पा दोन मध्ये भरघोस निधी दिला जात आहे. येत्या काळात राज्यात पिण्याचे पाणी, कचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने वर्गीकरण महाराष्ट्रातील सर्वच शहरात होणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी साडेचार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिले गेले आणि त्याचे वितरणही पूर्ण झाले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.