कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही – कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांची अंमलबजावणी करताना कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित 34 व्या गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी ” हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळा”स रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार 2019 देऊन गौरविण्यात आले रुपये ७५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, तर रु.५० हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेला 2019चा कामगार भूषण पुरस्कार राजेंद्र हिरामण वाघ, कमिन्स इंडिया लिमिटेड, कोथरूड पुणे यांना देण्यात आला. तसेच रु.२५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेल्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराने ५१ कामगारांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमास कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल, विकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कामगार विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, कामगार विभागाचे उपसचिव शशांक साठे, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, असंघटीत क्षेत्रातील वाहन चालक, शेतमजूर, ऊस तोड कामगार आदीं असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी महामंडळे स्थापन करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. त्या माध्यमातून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण हा होणार आहे. संघटीत कामगारांना सुरक्षा असते, कायदेशीर संरक्षण असते मात्र असंघटीत कामगारांच्या बाबतीत अशी परिस्थिती नसते. असंघटीत कामगारांच्या मनात असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी राज्य शासन उद्योगधंद्यांच्या आस्थापना ह्या कामगारांच्या हिताला बाधा पोहोचनार नाही, अशी धोरणे अंगीकारण्यास प्रवृत्त करेल. कुठल्याही देशाचा जीडीपी मालकामुळे न वाढता कामगारांमुळे वाढतो. त्यामुळे सर्व कारखानदारांनी कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा द्यावी, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केले.
राज्यमंत्री कडू म्हणाले, श्रमावर आधारित योजना निर्माण झाल्या पाहिजेत. कामगारांचे हात बंद पडले की देश बंद पडतो. केंद्राच्या कामगार कायद्याचा कामगारांना फटका बसू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील. कामगार मागे राहू नये यासाठी राज्य शासन आपले धोरण अवलंबेल, असे राज्यमंत्री कडू म्हणाले.
दरम्यान मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन झाले.समारंभापूर्वी मंत्री मुश्रीफ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ व राज्य कडू यांच्या हस्ते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट कामगार कल्याण मंडळाच्या श्रमकल्याण युग या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी प्रास्ताविक केले तर सहायक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी आभार मानले.