कोतवाल लघु पाटबंधारे योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख
मुंबई : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कोतवाल लघु पाटबंधारा योजनेमुळे येथील स्थानिकांना फायदा होणार आहे, त्यामुळे या योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल असे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.पोलादपूर येथे मौजा कोतवाल प्रकल्पाच्या आढावा संदर्भातील बैठक आज मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार भरतशेठ गोगावले, विभागाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, जलसंधारणाचे अपर आयुक्त सुनिल कुशिरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
गडाख म्हणाले की, कोतवाल लघु पाटबंधारे योजनेचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत लवकरच पूर्ण करण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन पूर्ण करणे, स्थानिक शेतकऱ्यांना मोबदला देणे ही कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येतील. याशिवाय या आर्थिक वर्षात या योजनेसाठी आवश्यक असलेली सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन या योजनेसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.गेल्या काही वर्षांपासून या योजनेचे काम सुरु असून हे काम यावर्षी पूर्णत्वास जाण्यासाठी संबंधित विभागाने या योजनेसाठी कालबद्ध आराखडा तयार करुन त्या आराखड्यानुसार काम करावे. या योजनेअंतर्गत काम पूर्ण करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही आणि योजनेचे काम थांबणार नाही याची काळजी मृद व जलसंधारण विभागामार्फत घेण्यात यावी असे यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले