साई भाई गँगच्या कुख्यात फरार आरोपीला कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने केली अटक
कोल्हापूर – कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मोक्का गुन्ह्यासह विविध गुन्ह्यात फरारी असलेला आरोपी विशाल प्रकाश वडर याला अटक केली आहे अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली आहे.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मोका अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या आरोपींची शोध मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिसांनी आरोपी विशाल प्रकाश वडर (वय-24 राहणार -1416 – इ वॉर्ड शाहूनगर राजारामपुरी याला अटक केली आहे. ही कारवाई पुलाची शिरोली गावाच्या हद्दीतील पीर वाले साहेब बाबा दर्गा येथे केली असल्याचं स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
तसेच आरोपी विशाल वडर याच्यावरती राजारामपुरी पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत वडर हा फरारी असल्याने त्याचा शोध घेतला जात होता. अखेर आज सोमवार दि 6 सप्टेंबर रोजी तो स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाच्या हाती लागला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील रामचंद्र कोळी, आसिफ कलायगार ,सुरेश पाटील, विनोद कांबळे ,अनिल जाधव यांनी केली आहे