आळंदीत १७ तारखेपासून कार्तिकी वारी
आळंदी । सह्याद्री लाइव्ह । संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील कार्तिकी वारीस कर्तिक वद्य अष्टमीपासून देऊळवाड्यासमोरील महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरूवात होईल. वारीतील मुख्य सोहळा कार्तिकी वद्य एकादशी आणि माउलींचा समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला साजरा केला जातो.
कार्तिकी वारी सोहळ्यानिमित्त मंदिरात हरिनाम सप्ताह प्रतिपदेपासून सुरू होतो. बाबासाहेब आरफळकर यांच्या हस्ते महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनानंतर वीणा मंडपात साडे सहा ते आठ योगिराज ठाकूर, रात्री नऊ ते अकरा बाबासाहेब आजरेकर यांच्यावतीने किर्तनसेवा तर रात्री दहा ते पहाटे चारपयंत वासकर महाराज, मारूतीबुवा कराडकर, हैबतबाबा आरफळकर यांच्यावतीने क्रमानुसार जागराचा काऱ्यक्रम होईल.
दूसऱ्या दिवशी नवमीला वीणा मंडपात सायंकाळी साडे आठ बाबासाहेब देहूकर, रात्री साडेनऊ ते अकरा वासकर महाराज यांचे किर्तन व दशमीला सायंकाळी साडेचार ते साडेसहा गंगूकाका शिरवळकर, साडेसहा जे साडेआठ धोंडोपंतदादा अंत्रे, रात्री नऊ ते अकरा वासकर महारात यांचे किर्तन व त्यानंतर साडेअकरा ते साडेबारा वाल्हेकर यांच्यावतीने जागर होईल.
कार्तिकी वद्य एकादशीला मध्यरात्री माऊलींच्या समाधीवर अकरा ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चाराने पहाटपूजा केली जाईल. दुपारी एकच्या दरम्यान माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. रात्री बारा ते दोन मोझे यांच्यावतीने जागर होईल. कार्तिकी वद्य द्वादशीला मध्यरात्री शासकीय पूजा जाईल. दुपारी चारच्या दरम्यान माऊलींचा चांदीचा मुखवटा रथामध्ये ठेवून नगरप्रदक्षिणेसाठी रथोत्सव केला जाईल. दुपारी चार ते सहा हरिभाऊ बडवे यांचे कीर्तन, रात्री नऊ ते अकरा केंदूरकर यांच्यावतीने कीर्तन होईल.
कार्तिकी वद्य त्रयोदशीला माऊलींच्या संजीवन समाधी दिन असल्याने मध्यरात्री माऊलींच्या समाधीवर प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते पवमान पूजा केली जाईल. सकाळी सात ते नऊ हैबतबाबा पायरीपुढे हैबतबाबा आरफळकर यांच्यावतीने कीर्तन, सकाळी साडेसात ते साडेनऊ वीणा मंडपात आळंदी देवस्थानच्यावतीने कीर्तन, सकाळी सात ते नऊ आणि नऊ ते अकरा भोजलिंग काका मंडपात दाणेवाले निकम दिंडीच्यावतीने कीर्तन सेवा होईल. सकाळी दहा ते बारा संत नामदेव महाराज यांचे सोळावे वंशज नामदास महाराज यांचे समाधी सोहळ्याचे मुख्य कीर्तन होईल. त्यानंतर पुष्पवृष्टी, घंटानाद आणि आरती झाल्यानंतर सोहळा पार पडेल. सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वीणामंडपात सोपानकाका देहूकरांचे कीर्तन होईल. रात्री बारा ते पहाटे चार हैबतबाबा आरफळकर यांच्यावतीने जागराचा कार्यक्रम होईल. कार्तिकी वद्य अमावस्येला रात्री साडे नऊनंतर पालखी सोहळ्याची छबिना मिरवणुकीने सांगता होईल.