शासन व समाज यांच्यातील पत्रकार हा महत्त्वाचा दुवा : पल्लवी धात्रक
नाशिक : पत्रकार हा भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, शासन व समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यरत असतो. शासनाचे ध्येयधोरणे, विकासात्मक योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे काम हे सातत्याने पत्रकारांमार्फत होत असते, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले.
आज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व उधाण युवा बहुउद्देशीय मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनानिमित्त क्रीडा पत्रकारांचा सन्मान सोहळा जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात होता. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक बोलत होत्या. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी अर्चना देशमुख, विभागीय माहिती कार्यालाच्या सहाय्यक संचालक मोहिनी राणे, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, महेश पाटील, उधाण युवा बहुउद्देशिय मित्र मंडळाचे अध्यक्ष जगदीश बोडके, माहिती सहाय्यक जयश्री कोल्हे, किरण डोळस, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था संचालिका शोभा बोडके, प्रकाश पवार, स्काऊट व गाईडच्या जिल्हा संघटक हेमांगी पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक म्हणाल्या की, खेळाडूंच्या जडणघडणीत पत्रकार बांधवांचा मोठा वाटा आहे. उद्योन्मुख खेळाडूंच्या कर्तृत्वाला उभारी देण्यासाठी वृत्तपत्र माध्यमांचे योगदान मोलाचे आहे. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी असलेले नवनवीन उपक्रम, संधी, स्पर्धा, आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम व क्रीडा शिबीर यांची माहिती समाजातील तळागाळातील खेळाडूंपर्यंत पोहचविण्यासाठी पत्रकार हे कायम अग्रस्थानी राहिले आहेत, अशा भावना जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पत्रकार व माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा केला सत्कार
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी अर्चना देशमुख, विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक मोहिनी राणे, माहिती सहाय्यक जयश्री कोल्हे, किरण डोळस, छायाचित्रकार मनोज अहिरे, दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे फणिंद्र मंडलीक, दैनिक लोकसत्ताचे अविनाश पाटील, दैनिक दिव्य मराठीचे सचिन जैन, दैनिक सकाळचे तुषार महाले, दैनिक लोकमतचे धनंजय रिसोडकर, दैनिक पुण्यनगरीचे अनिल दिक्षित,
दैनिक भ्रमरचे नाना खैरनार, दैनिक आपले महानगरचे साई पाटील, दिशा न्यूजचे मनोहर गायकवाड यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व उधाण युवा बहुउद्देशीय मित्र मंडळाचे अध्यक्ष जगदिश बोडके यांच्या हस्ते सन्माचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी अविनाश टिळे तर आभार प्रदर्शन महेश पाटील यांनी केले