जितेंद्र आव्हाड यांना अटक
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. हर हर महादेव चित्रपटावरून चित्रपटगृहात गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. चित्रपटगृहात एका तरुणाला मारहाण झाली होती. शिवाय शो देखील बंद करण्यात आला होता. त्यामुळे मोठा वाद झाला होता. आव्हाड यांना वर्तकनगर पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली आहे.
चित्रपटातून संपूर्ण मराठा समाजाचा अपमान केला गेला आहे. शिवाजी महाराजांना बदनाम करण्यात येत आहे. त्याला विरोध करण्यासाठी कारागृहात जावं लागत असेल तर मी सहज जाईल. जामिनासाठी देखील अर्ज करणार नाही, असंही आव्हाड म्हणाले. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान आव्हाड यांनी ट्विटरवर ट्विट करत अटकेची सविस्तर माहीती दिली आहे.
“आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल.”