लेखनाच्या माध्यमातूनच अनेक पिढ्यांशी एकाचवेळी जोडले जाता येईल – लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे
मुंबई : जो लिहितो तोच लेखक आहे असे नाही तर जो विचार करतो, जो काही तरी सांगू पाहतो तो खऱ्या अर्थाने लेखक असतो. आपल्या मनात आलेले विचार सहजपणे सुचणे आणि लिहिणे यासारखा सुंदर उपक्रम असू शकत नाही. कारण याच लेखनाच्या माध्यमातून आपण सहजपणे अनेक पिढ्यांशी जोडले जातो असे लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते, साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या “मनातला पाऊस” या अरुण शेवते संपादीत ऋतूरंग प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात दिग्दर्शक, कवी नागराज मंजुळे यांच्या हस्ते आणि मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात झाले. या प्रकाशन सोहळ्यास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार विनायक राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार मंजुळाताई गावीत, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार दिपक केसरकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार शेखर निकम, आमदार महेंद्र थोरवे, आमदार किशोर जोरगे, ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अंबरीश मिश्र, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील, लेखक विश्वास पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंजुळे म्हणाले, फॅंड्री केल्यानंतर अनेक लोकांचा संपर्क येऊ लागला. गडाख कुटुंबियांशी माझी त्यानंतर ओळख झाली. यशवंतराव गडाख यांना मी गेल्या 9 ते 10 वर्षांपासून ओळखत असून प्रत्येक वेळी त्यांना भेटल्यावर मला त्यांच्याबद्दल वेगळा जिव्हाळा वाटतो. आज त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले, हा माझा सन्मान वाटतो.
समाजात राहताना संवेदनशील असणे गरजेचे आहे. या पुस्तकातून यशवंतराव स्वत: बोलल्याचा भास होतो.
अनेकदा त्या त्या वेळी त्या त्या गोष्टी करणे गरजेचे असते, त्यामुळे काहीतरी सुचले तर ते लिहून काढणे अत्यंत गरजेचे आहे. शाळेत असताना अभ्यासावरुन वडीलांकडून खूप मार खाल्ला पण आज वडील नसल्यावर वडीलांची माया कळून येते. दहावीत नापास झाल्यावर किंवा नोकरी सोडल्यावरही आपले वडिल आपल्या मागे किती भक्कमपणे उभे होते हे सांगताना मंजुळे हळवे झाले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ म्हणाले की, मनात सतत वाईट भावना असतील तर मनात चांगले विचार येऊन ते मांडणे कठीणच असते. पण यशवंतराव गडाख यांनी राजकारणात असूनही समाजकारण करीत सोनई गावाचे सोने केले. राजकारणात असूनही शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम केले. 1970 मध्ये अहमदनगरमध्ये साहित्य संमेलन भरवून त्यांनी आपले साहित्यावर किती प्रेम आहे हे दाखवून दिले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अंबरीश मिश्र यावेळी म्हणाले की, लेखक आणि पत्रकार हे अनोळखी वाचकांच्या प्रेमावर जगत असतात. माझी आणि यशवंतराव यांची रोज भेट होत नसली तरी आमची चांगली मैत्री आहे. आपल्या लेखनाशी संवेदना आणि प्रामाणिकता असेल तर सोनई असो किंवा सॅन फ्रॅन्सिस्को लेखनातला आनंद मिळतच राहतो.
ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले की, मनातला पाऊस हे पुस्तक अत्यंत सुंदर आहे. राजकारण करीत असताना समाजकारण कसे करता येते, आपल्या अवती भवती आपल्यासाठी काम करणारे, आपल्या परिचयातले किती महत्त्वाचे असतात हे त्यांनी खूप चांगल्या शब्दांमध्ये मांडले आहे. आजच्या काळात आपल्याला सूचत असलेल्या गोष्टी लिहून ठेवणे आवश्यक आहे.
एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणाले की, सालसपणा, सुस्वभावीपणा आणि संस्कृतपणा यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव गडाख यांनी नेहमीच जपला. यशवंतराव गडाख यांचे लिखाण हे ग्रामीण जीवनाशी नाळ जोडणारा आहे. त्यांनी आपल्या लेखनातून प्रत्येक गावाचे काय वेगळे वैशिष्टय असू शकते हे उत्तमपणे मांडले आहे. सध्या वाढत्या शहरीकरणामुळे गावाचे अस्तित्व कमी होत असताना मनातला पाऊस हे मनाला आनंद देणारे पुस्तक आहे.
या पुस्तकाविषयी अरुण शेवते म्हणाले, यशवंतराव गडाख आणि माझी अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. 1993 साली मी त्यांची पहिली मुलाखत घेतली आणि आज इतक्या वर्षांनी त्यांची अनेक पुस्तके संपादीत केल्यानंतर मनातला पाऊस हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा आनंद आहे.
यापूर्वी यशवंतराव गडाख यांचे अर्धविराम आत्मचरित्र, अंर्तवेध, सहवास, माझे संचित ही पुस्तके प्रकाशित झाली असून अर्धविराम हे आत्मचरित्र, पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले होते. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले आहेत. यशवंतराव गडाख यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ऋतुरंग मधल्या निवडक लेखांचे हे पुस्तक असून या पुस्तकाचे संपादन अरुण शेवते यांनी केले आहे.