हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील 107 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तब्बल 20 वर्षांनंतर अनुभवली ‘दुनियादारी’!
जुन्या आठवणींना दिला उजाळा : प्रेमविवाहानंतर 20 वर्षे सुखी संसार करणा-या मित्र-मैत्रिणीला दिले खास ‘सरप्राइज गिफ्ट’
राजगुरुनगर (खेड, पुणे) । सह्याद्री लाइव्ह । हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील सन 2000-2003 या बॅचमधील कला शाखेच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा नुकताच थाटामाटात संपन्न झाला. या मेळाव्यात तब्बल 107 मित्र-मैत्रिणींनी सहभाग नोंदवत 20 वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा दिला. भन्नाट किस्से, गप्पा-गोष्टी, नृत्य-गाणी, धमाल-मस्तीमुळे ‘गेट-टुगेदर’ला कमालीची रंगत आणली. विशेष म्हणजे वर्गातील मित्र-मैत्रिणींचं प्रेम आणि त्यानंतर विवाह अन् 20 वर्षांच्या सुखी संसाराबद्दल ‘या’ ग्रुपमेंबरचा विशेष कौतुक सोहळा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलन आणि प्रार्थनेनंतर कार्यक्रमाला प्रारंभ झाला. शीतल भंडलकर यांनी ‘गेट-टुगेदर’ घेण्याचामागील उद्देश, आपल्या ग्रुपमधील आपुलकीची संकल्पना आणि कॉलेजमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
स्वपरिचय आणि मनोगतामधून प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. मयूर लोखंडे यांनी काही ‘फनी गेम’ घेत उपस्थितांची ‘परीक्षा’ घेत निखळ मनोरंजन केले. यावेळी हर्षदा तांबे, सविता करंडे, सतीश डांगले, साधना गोगावले, निर्मला आडागळे, गणेश कोबल, विजय खंडागळे, संतोष कोकणे, रुपाली थिगळे, माऊली पिंगळे, संतोष चौधरी, राजेश दौंडकर, भावेश टाकळकर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मैत्री जपत सर्वत्र वावरणारा गोविंद घनवट यांनी धम्माल उडवून दिली.
दरम्यान, आकस्मित निधन झालेल्या नीलम बोरकर, सतीश मांजरे, संदीप शिंगाडे, रोहिणी तांबे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच सकाळी अल्पोपहार, स्वादिष्ट जेवण आणि चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम आभाराकडे वळाल्यानंतर बहुतेकांचे डोळे पाणावले. पुन्हा भेट कधी होईल? अशी विचारपूस करीत एकमेकांना निरोप घेतला.
हल्ली धकाधकीच्या आयुष्यात स्वतःच्या दुनियेत रमलेल्या मित्र आणि मैत्रिणी यांना कॉलेज जीवनाची आठवण यावी, यासाठी या मेळाव्याचे नियोजन केले. तत्कालीन विद्यापीठ प्रतिनिधी रूपेश बुट्टे पाटील, अंकुश कारले, गायत्री कोरे, बबन होले, रोहिदास होले, मयूर लोखंडे, पौर्णिमा जगदाळे, दत्ता सरडे यांनी स्नेहमेळाव्याचे संयोजन करीत गेट-टुगेदर यशस्वी केले.
प्रास्ताविक शीतल भंडलकर यांनी केले. सूत्रसंचालन कवी संतोष गाढवे यांनी केले. पौर्णिमा जगदाळे यांनी आभार मानले.
प्रेमविवाह अन् सुखी संसाराला ‘सरप्राइज गिफ्ट’…
कॉलेजमध्ये वर्गमित्र बबन होले आणि मैत्रिणी वैशाली हिंगे यांनी विवाह केला. या विवाहाला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या गेट-टुगेदरच्या माध्यमातून दोघांना ग्रुपतर्फे ‘सरप्राइज गिफ्ट’ देण्यात आले. रुपेश बुट्टे पाटील यांनी बबन आणि वैशाली यांना प्रेमाचं प्रतीक असलेल्या राधा-कृष्णाची मूर्ती दिली. गेट-टुगेदरमधील या अगळ्यावेगळ्या सोहळ्यामुळे उपस्थितांमधील उत्साह द्विगुणीत झाला.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES