सभासद, ठेवीदारांशी ‘ज्योती आवाज’ संस्थेचं कौटुंबिक नातं – जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप
रौप्य महोत्सव समारंभ : माजी सरपंच शांताराम घुमटकर यांना समाजभूषण पुरस्काराने गौरव; डॉ. रमेश दौंडकर यांचा विशेष सन्मान
राजगुरुनगर (खेड, पुणे) । सह्याद्री लाइव्ह । समाजातील गरजूंना वित्तपुरवठा व्हावा, म्हणून २५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात ज्योती आवाज पतसंस्थेचं रोपटं लावण्यात आलं. आज या संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करताना संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, कर्जदारांना मनस्वी आनंद वाटतो. संस्था लहान असताना सभासदांच्या दैनंदिन संपर्कात असल्यामुळे ठेवीदार, सभासदांचे संस्थेप्रती अनोखं कौटुंबिक नातं निर्माण होतं आणि ते कायम टिकतं, हेच वात्सल्य ज्योती आवाज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेने टिकून ठेवलं आणि संस्थेची आज विश्वासार्हता वाढली आहे, असे मत पुणे (ग्रामीण) सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी शनिवारी (दि. २८ ऑक्टोबर) व्यक्त केले.
राजगुरुनगर येथील चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात ज्योती आवाज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रकाश जगताप बोलत होते. यावेळी सहकारी संस्था राजगुरुनगर (खेड) सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे, रिलायन्स फायर प्रोटेक्शन सिस्टीमचे (मुंबई) संचालक डॉ. रमेश दौंडकर, माजी सरपंच आणि समाजभूषण पुरस्काराचे मानकरी शांताराम नथुजी घुमटकर, संस्थेचे संस्थापक कृष्णकुमार शिनलकर, अध्यक्ष प्रा. विष्णू लडकत, उपाध्यक्ष विलास भास्कर आदी उपस्थित होते.
देशात आगीच्या घटनांबाबत फारसं गांभिर्यानं घेतलं जात नाही, त्यामुळे मोठं नुकसान सहन करण्याची वेळ आपल्यावर येते, अशी खंत व्यक्त करीत डॉ. रमेश दौंडकर म्हणाले की, उद्योगक्षेत्रात आगीच्या घटनेकडे पाहताना पारंपारिक (जुनाट) गोष्टींचा विचार केला जातो. म्हणून देशात आणि औद्योगिक क्षेत्रात आगीच्या घटनांबाबत जनजागृती करणे गरजेची बाब बनली आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक कृष्णकुमार शिनलकर, सत्कारमूर्ती शांताराम घुमटकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अविनाश कहाणे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सांडभोर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते जि. र. शिंदे, प्रा. गोपीचंद गायकवाड, उपस्थित होते. संस्थेचे संचालक बबनराव थोरात, राजाराम थिगळे, जयंत घोरपडे, मीनाक्षी गुजराथी, ॲड. महादेव घुले, ॲड. मुकूंदराव निगडे, राणी पांढरकर, प्रदीप घुमटकर, अनिल लांडगे, रवींद्र अंकुश, दीपक गायकवाड, राजकुमार शिरसाट उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजनाने करण्यात आली. स्मरणिका प्रकाशन करण्यात आले. तसेच माजी सरपंच शांताराम घुमटकर यांना संस्थेच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘चांद्रयान ३’मध्ये विशेष कामगिरी करणारे खेड तालुक्याचे सूपूत्र आणि कन्हेरसर गावचे डॉ. रमेश दौंडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिक, माजी संचालक, नियमित कर्जदार, सेवकांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन कैलास दुधाळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ॲड. महादेव घुले यांनी केला. प्रास्ताविकपर मनोगत प्रा. विष्णू लडकत यांनी केले. उपाध्यक्ष विलास भास्कर यांनी आभार मानले.
नोव्हेंबरपासून २५ लाखांपर्यंतचे गृहकर्ज १० टक्के व्याजदर…
प्रास्ताविकपर भाषणात बोलताना संस्थेचे अध्यक्ष विष्णू लडकत यांनी विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या ज्योती आवाज पतसंस्था १ नोव्हेंबरपासून पतसंस्थेमार्फत ठेवीदार आणि कर्जदारांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यामध्ये आता पतसंस्थेमधील व्यव्हारासाठी ज्येष्ठ सभासदांना घरपोच कार्यालयात येण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी घरपोच सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच सोने खरेदी योजना, मासिक ठेव योजना आणि विशेष म्हणजे एक नोव्हेंबरपासून पतसंस्थेमार्फत गृहकर्जाची खास योजना सुरू केली आहे. २५ लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी १० टक्के व्याजदर ठेवण्यात आला आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES