नगर दिवाणी व सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
मुंबई : नगर दिवाणी व सत्र न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई कार्यालयाचे समिती सभागृहात आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त उत्साहात योगाभ्यास करण्यात आला.
शहर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई, मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई बार असोशिएशन व रोटरी क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने योगा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये भारताचे प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्री यांचे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त भाषणाचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये रोटरी क्लब मुंबई यांच्यामार्फत प्रशिक्षकांनी उपस्थितांना योगांबाबतचे काही विविध योगासनाचे प्रकारांचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य कसे टिकवून राहिल याबाबचे उपाय यांची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमास प्रभारी प्रमुख न्यायाधीश, नगर दिवाणी व सत्र न्यायालय तथा प्रभारी अध्यक्ष मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राहुल एन. रोकडे, शहर दिवाणी व सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश, मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ज्ञानेश्वर सी.पताळे, मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतिश बा. हिवाळे, शहर दिवाणी व सत्र न्यायालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयुष मंत्रालय दिल्ली यांच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रभारी प्रधान न्यायाधीश, नगर दिवाणी व सत्र न्यायालय तथा प्रभारी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार या कार्यालयाचे समिती सभागृह, पहिला मजला येथे सकाळी 6.30 वा. योगअभ्यास वर्ग घेण्यात आला.