आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारी कौशल्ये आणि संविधानिक मूल्ये यांचा अंतर्भाव करावा – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई : राज्यातील विद्यार्थी घडविण्यासाठी काळाची पावले ओळखून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक विचार प्रक्रिया विकसित करणारी एकविसाव्या शतकातील कौशल्ये आणि संविधानिक मूल्ये याचा अंतर्भाव करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले.
राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समिती’ स्थापन करण्यात आली आहे. याद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा तुलनात्मक अभ्यास करून अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मदत केली जाणार आहे. या समितीची बैठक शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दि.१४ मार्च २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने झाली.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.देवेंदर सिंह यांनी बैठकीमध्ये आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकासंदर्भात समिती सदस्यांसमोर सादरीकरण करून पुढील रूपरेषा विशद केली. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम तयार करताना विचारात घ्यावयाच्या विविध बाबी, कौशल्य वयाचे विकसन करण्यासाठी शिक्षकांच्या अध्यापन पद्धती, याबाबत आयोजित करावयाची प्रशिक्षणे याबाबत यावेळी सांगोपांग चर्चा झाली.
पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) चे संचालक कृष्णकुमार पाटील, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्राचार्य (समन्वय) विकास गरड, ICSE बोर्ड प्रतिनिधी श्रीमती संगीता भाटिया, IB बोर्ड प्रतिनिधी महेश बालाकृष्णन, आरपीजी फाऊंडेशनच्या संचालक श्रीमती राधा गोयंका, अंजुमन- ई- इस्लाम चे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, फादर जॉर्ज अथाएड, केंब्रिजचे प्रतिनिधी शमीम चौधरी, स्कूल लीडरशिप नेटवर्क मुंबई चे संस्थापक फ्रान्सिस जोसेफ यांच्यासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, केंब्रिज आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ, विविध शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी आदी समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.