जुन्नरचे माजी सभापती सदाशिव बोरचटे यांच्या घरावर दरोडा टाकणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
नाशिक, मध्यप्रदेशातून सहा जणांना अटक; स्थानिक गुन्हे शाखा, आळेफाटा पोलिसांची कामगिरी
जुन्नर । सह्याद्री लाइव्ह । कोयता आणि पिस्तुलचा धाक दाखवून सोन्याचे ४९ तोळे दागिने व चार लाख रुपयांची रोकड असा २८ लाख ५० हजार रुपयांच्या ऐवजावर दरोडा टाकणा-या परप्रांतीय टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि आळेफाटा पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत सहा दरोडेखोरांचा छडा लागला. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात १९ डिसेंबर रोजी सभापती सदाशिव बोरचटे यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता.
या प्रकरणी सदाशिव रामभाऊ बोरचटे (रा. बेल्हे, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सदाशिव बोरचटे हे जुन्नरचे माजी सभापती आहेत. याबाबत इर्शाद नईम शेख (वय २८) इर्शाद याचे वडील नईम चांद शोख (वय ५२, दोघेही रा. नाशिक रोड, नाशिक), मोहम्मद हनीफअल्ला बंदखान (वय ६२, रा. पटेलनगर, खाजराणा, इंदोर), शुभम रामेश्वर मालवीय (वय २४, रा. गादेशहा पिपालिया, जि. देवास), रहमान फजल शेख (वय ३४, रा. जेलरोड, रामेश्वरी मंगल कार्यालय, नाशिक), लखन बाबूलाल कंडलिया (वय ३०, रा. रसलपूर, देवास) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांचे नाव आहे. इर्शाद व नईम शेख या बाप-लेकाला नाशिकमधून ताब्यात घेतले होते. त्यानंतर तांत्रिक तपासानंतर उर्वरित चौघांना मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले. तसेच आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदाशिव बोरचटे हे बेल्हे गावचे रहिवासी असून, त्यांच्या घरी १९ डिसेंबर रोजी भल्या पहाटे दोन ते साडेतीनच्या दरम्यान सहा जणांच्या टोळीने बोरचटे यांच्या कंपाऊंडची जाळी तोडली. त्यानंतर घराच्या हॉलच्या भिंतीची जाळी तोडून घरात प्रवेश केला.
दरोडेखोरांच्या गोंधळामुळे घरातील सदस्य झोपेतून जागे झाले. त्यावेळी दरोडेखोरांनी घरातील मंडळींना कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखविला. घरातील आणि कुटुंबातील सदस्यांच्या अंगावरील सोन्याचे ४९ तोळे दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर घरातील चार लाख रुपयांची रोकड असा २८ लाख ५० हजार रुपये किंमतीचा ऐवजावर दरोडा टाकून पसार झाले. या प्रकरणी फिर्यादी सदाशिव बोरचटे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
स्थानिक गुन्हे शाखा आणि आळेफाटा पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत नाशिकमधून इर्शाद व त्याचे वडील नाईम शेख यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून तपास आणि तांत्रिक माहितीच्या आधारे उर्वरित चौघांना मध्यप्रदेशातून अटक केली. गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधीक्षक मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्त्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, सहायक फौजदार मुकूंद कदम, पोलीस हवालदार दीपक साबळे, राजू मोमीन, पोलीस हवालदार विक्रमसिंह तापकीर, जनार्दन शेळके, सचिन घाडगे, योगेश नागरगोजे, चंद्रकांत जाधव, प्रमोद नवले, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय सुपे व आळेफाटा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी केली.
दरम्यान, अटक केलेल्या आंतरराज्य टोळीतील सदस्यांवर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी असे एकूण २० गुन्हे दाखल आहेत. या टोळीने दिंडोरी येथे एका कंपनीत दोन गुन्हे केले असल्याची कबुली दिली. दिंडोरी येथील गुन्ह्याचा तपास सुरू आहे. याशिवाय गुन्ह्यातील आरोपींनी दरोड्यातील गुन्ह्यात चोरलेल्या सोन्याची विल्हेवाट लावल्याचे पोलिसांनी सांगितले.