नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्याच्या सामूहिक उत्कर्षासाठी ‘रोडमॅप’ ठराव्यात – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
नागपूर : जिल्हा नियोजन विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करताना त्याची व्यापकता अधिक असली पाहिजे. त्यामुळे आगामी वर्षच्या नियोजनातून शिक्षणासंदर्भातील तीन योजना नागपूर जिल्ह्यात राबविण्याबाबतची महत्त्वपूर्ण सूचना ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी केली आहे. नियोजन विभागाच्या बैठकीनंतर त्यांनी नियोजन अधिकाऱ्यांना यासंदर्भातील निर्देश दिले.
शैक्षणिक सुधारणांकडे आगामी काळात लक्ष वेधणे आवश्यक आहे. प्रयोग नवी दिल्लीतील असो की गडचिरोलीतील असो त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अशाच नाविन्यपूर्ण योजना जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांमार्फत सादर व्हाव्यात. यामार्फत जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्रांती आणि पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. नियोजन बैठकीत त्यांनी विधानसभा निहाय स्पर्धा परीक्षा केंद्रांची उभारणी, जिल्ह्यात करण्यात यावी. तसेच दिल्लीच्या धर्तीवर स्मार्ट स्कूल योजना राबविण्यात यावी, गडचिरोलीमध्ये अहेरी, सिरोंचा, धानोरा व भामरागड येथे यशस्वी झालेल्या शैक्षणिक प्रयोग नागपुरात करण्यात यावे, अशा प्रमुख तीन सूचना केल्या.
प्रशासकीय सेवापूर्व स्पर्धा परीक्षा केंद्राचे अद्यावतीकरण करुन त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा. जास्तीत जास्त विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण व्हायला हवेत, यासाठी जिल्ह्यात काय करता येईल असा साधक-बाधक प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. या सेंटरमधील वसतिगृह सर्व सोयीयुक्त करा, अभ्यासासाठी वातावरण निर्मितीसह चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेत अग्रणी राहतील याकडे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी लक्ष वेधले.
जिल्ह्यात विधानसभा निहाय त्यासोबत नागपूर महापालिकेतील सहाही विधानसभा क्षेत्रात केंद्र चालु करा व ते मुख्य केंद्राला जोडा. या केंद्रात सर्व जाती धर्माचे व्यक्ती एकाच ठिकाणी राहतील त्यामुळे त्यांचा वैचारिक पध्दतीत बदल घडवून आणा, अशा सूचना त्यांनी दिल्या.महापालिकेने विधानसभानिहाय सीबीएससी शाळा सुरु करण्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र सुरु करावेत, असेही पालकमंत्री म्हणाले.
कौशल्य विकासाचा आढावा घेतांना पालकमंत्री म्हणाले की, महास्वयंम पोर्टलवर सर्व उद्योग व व्यवसायांची शंभरटक्के नोंदणी करा, व्यवसायाभिमुख प्रशिक्षणावर भर दया. प्लेसमेंटनुसार निधी वाटप करण्यात येइल, असेही त्यांनी सांगितले. ट्रेडनुसार मानांकन असल्यामुळे जिल्ह्यात उद्योग समूहांना आवश्यक असणाऱ्या ट्रेडचे प्रशिक्षण द्या. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग विभाग व उद्योग प्रतिनिधीशी बैठक घेवून सादरीकरणाद्वारे माहिती देण्याच्या सूचना कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त यांना दिल्या. शहरी भागासोबतच ग्रामीण भागावर जास्त भर द्या, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्थामध्ये कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना आमदार अभिजीत वंजारी यांनी केल्या. आता पर्यंत 3 हजार 640 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशिक्षण व व्यवसाय अधिकारी यांनी दिली.दिल्लीच्या धर्ती जिल्ह्यात स्मार्ट स्कुल योजना राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गडचिरोलीप्रमाणे नाविण्यपूर्ण योजनेतून मॉड्युलर स्कुलसाठी प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सांगितले.