नाविन्यता आणि उद्योजकतेला मिळेल मोठ्या प्रमाणात चालना- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई | सह्याद्री लाइव्ह | मागील काही वर्षात आपला देश विकासविषयक विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे. देशामध्ये युवकांमधील नवनवीन संकल्पनांवर आधारीत स्टार्टअप्स, युनिकॉर्न्स यांना चालना देण्यात येत आहे. या क्षेत्रात योगदान देत असलेल्या युवक-युवतींनी आपल्या कल्पना, आपले कार्य भारत देशासाठी समर्पित करावे, यामुळे देशातील इतरही युवक-युवतींना पुढे येण्यास मदत होईल. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सच्या विकासासाठी राज्यात विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्यामधून नाविन्यता आणि उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला.
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात आलेल्या स्टार्टअप सप्ताह आणि स्टार्टअप यात्रेतील विजेत्यांना आज राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी़ डॉ. रामास्वामी एन. आदी मान्यवर उपस्थित.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विविध क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. यामध्ये सर्वांचे योगदान आहे. मागील आठ वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रात मोठी आघाडी मिळवली आहे. यापुढील काळातही देशाला अधिक प्रगत बनविण्यासाठी सर्वांनी परिश्रम, दृढसंकल्प आणि आत्मविश्वासाने साथ द्यावी. देशातील युवक नवनवीन संकल्पना आणून यात योगदान देत आहेत, स्टार्टअप्स, युनिकॉर्न्सची निर्मिती करीत आहेत. या क्षेत्रामध्येही आता युवकांनी ‘युनिक’ काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.