भारताच्या “वर्ल्ड कप” प्रवासाचा अंत
एडिलेड । सह्याद्री लाइव्ह । टी २० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव केला. भारताचे 169 धावांचे आव्हान इंग्लंडने अवघ्या १६ षटकात एकही विकेट न गमावता पार केले. जॉस बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. तर ॲलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या.
भारताच्या मंदावलेल्या धावसंख्येला हार्दिक पांड्याने 32 चेंडूत 63 धावांची धडाकेबाज खेळी करत भारताला 20 षटकात 6 बाद 168 धावांपर्यंत पोहचवले. याचबरोबर विराट कोहलीने देखील अर्धशतकी खेळी करत हार्दिकसोबत पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली. रोहित शर्माने 27 तर सूर्यकुमार यादवने 14 धावांचे योगदान दिले.
भारताचे 169 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने पॉवर प्लेमध्येच आपला विजय निश्चित केला. सलामीवीर जॉस बटलरने पहिल्या चेंडूपासून आक्रमक हल्ला चढवण्यास सुरूवात केली. नंतर ॲलेक्स हेल्सने देखील बटरला साथ देण्यास सुरूवात केली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये 63 धावांपर्यंत मजल मारली.
पॉवर प्लेनंतर हेल्सने धडाकेबाज फलंदाजी करत आपले अर्धशतक आणि संघाचे शतक धावफलकावर लावले. त्यानंतर कर्णधार बटलरने देखील अर्धशतकी मजल मारली. सूर्यकुमार यादवने बटलरचा झेल सोडला आणि भारताला एकमेव विकेट घेण्याची संधी होती ती देखील दवडली. त्यामूळे भारत यंदाच्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. आता नोव्हेंबरला इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत होईल.