पुणे जिल्ह्यात दुसऱ्या डोसचे प्रमाण वाढवा; जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांचा आदेश
पुणे : कोविड लसीची दुसरी मात्रा देण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी मोहीम स्तरावर प्रयत्न करावे आणि पोर्टलवर लसीकरणानंतर तातडीने नोंद घेण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा स्तरीय कृतीदल समिती आणि आरोग्य विषयक विविध समित्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले की, गेल्या काही दिवसात राज्यातील कोविड बधितांच्या प्रमाणात किंचित वाढ झाली आहे. ‘ओमायक्रान’च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि कॅन्टोन्मेंट भागात कोविड चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. ओमायक्रान प्रसाराचा वेग अधिक असल्याने लक्षणे असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी केली जाईल याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आरोग्यविषयक इतरही कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. पुरंदर, दौंड आणि मुळशी तालुक्यांनी आरोग्य विषयक निर्देशकाबाबत आवश्यक कार्यवाही करावी. डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव असणाऱ्या शहरी भागात सर्वेक्षण आणि जनजागृतीवर भर द्यावा. प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत जुन्नर आणि बारामती तालुक्यात गरोदर मातांच्या लसीकरणाकडे विशेष लक्ष द्यावे आणि बालकांच्या लसीकरणाच्या नोंदी वेळेवर कराव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अभियान नियामक समिती, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण समिती, जिल्हा हिवताप सोसायटी, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण समिती, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, जन्म मृत्यू नोंदणी, तसेच जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
जानेवारी महिन्यात होणाऱ्या पोलिओ लसीकरण मोहिमेचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, मोहिमेअंतर्गत स्थलांतरीत कामगारांच्या वस्त्यांमधील बालकांना पोलिओची मात्रा देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. जिल्ह्यातील उद्योग आणि साखर कारखान्यातील मजुरांना पोलिओ कार्यक्रमाविषयी माहिती देण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. जनजागृतीवर भर देण्यात यावा.