साखर निर्यातीमध्ये वाढ
६० लाख टन साखर निर्यातीला केंद्राची परवानगी
कोल्हापूर । सह्याद्री लाइव्ह । केंद्राने ६० लाख साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. १ नोव्हेंबर २२ ते ३१ मे २०२३ या मुदतीकरिता हा कोटा आहे. केंद्रीय खाद्य मंत्रालयाने शनिवारी या बाबतचे परिपत्रक जारी केले.
देशातील कारखाने गेल्या तीन वर्षांच्या साखर उत्पादनाच्या १८.२३ टक्के एकसमान निर्यात करू शकतात, असे नमूद केले आहे.
निर्यातीसंबंधी महत्वाची नियमावली
केंद्राने निर्यात कोट्यास परवानगी देताना काही नियम कारखान्यांना दिले आहेत. ज्या कारखान्यांना साखर निर्यात करायची नाही ते साखर कारखाने कोटा एक्स्चेंज करू शकतात. अशा कारखान्यांनी ६० दिवसांच्या आत कोटा एक्स्चेंज करावा. त्यांनी याच कालावधीत केंद्राला या बाबत कळवावे. तसेच कोटा परत करावा.
कोणत्याही परिस्थितीत कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य देण्यासाठी ही नियमावली तयार केल्याचे केंद्राने म्हटले आहे. कच्च्या साखरेसह अन्य सर्व प्रकारची साखर निर्यात करता येणार आहे. केंद्राला निर्यातीची दररोज माहिती मिळावी यासाठी दररोज याची नोंद ऑनलाइन ठेवण्याचेही केंद्राने म्हटले आहे.
नियमांचे पालन न केल्यास दंड
कारखान्यांनी कोट्याची अदलाबदल न केल्यास अथवा कोट्याच्या ९० टक्के साखर निर्यात न केल्यास केंद्र जून जुलैच्या कोट्यामध्ये दंड म्हणून संबंधित कारखान्याचा देशांतर्गत विक्री कोट्यामध्ये ३० टक्क्यांपर्यंत कोटा कमी देऊ शकते.
केंद्राच्या निकषानुसार महाराष्ट्रातून सुमारे २० लाख टन साखर निर्यात होऊ शकते. उत्तर प्रदेशाला ही जवळपास इतकाच कोटा आहे. मात्र यंदा ही महाराष्ट्रातूनच सर्वाधिक निर्यात होईल, अशी शक्यता आहे.