पुणे बार असोसिएशनच्या ठेवीमध्ये वाढ
1 कोटींचा टप्पा पार आजीव सभासद होण्याच्या आवाहनाला प्रतिसाद
पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनने 1 कोटींच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे. पुणे बार असोसिएशनच्या ठरावानुसार,आजीव सभासदत्व देणे सुरू आहे. त्यासाठी शहरातील न्यायालयांमध्ये वकिली व्यवसाय करणाऱ्या सर्व वकिलांना आजीव सभासद होण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे.
त्यास वकिलांनी प्रतिसाद दिल्यामुळे ठेवीमध्ये ही घसघशी वाढ झाली आहे. दोन हजार रुपये भरून वकिलाला आजीव सभासदत्व मिळणार आहे. अधिकाधिक वकिलांनी आजीव सभासदत्व व्हावे, असे आवाहन पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतीश मुळीक यांनी केले आहे.
ही रक्कम मुदत ठेवीमध्ये गुंतविण्यात आलेली आहे. वकिलांनी आणखी प्रतिसाद दिल्यास ही रक्कम सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंत जावू शकणार आहे. त्या रक्कमेच्या व्याजावर संघटनेचे दरवर्षीचे कामकाज पार पडेल. संघटनेची आर्थिक ताकदही वाढेल. त्यामुळे अधिकाधिक वकिलांनी हे सभादत्व स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.