“आरोग्य विमा’ मागणीत वाढ
करोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर नागरिकांचा कल
पुणे : करोनाच्या तिसऱ्या लाटेत आरोग्य विम्याच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य विम्याच्या मागणीचा अभ्यास करणारा एक अहवाल नुकताच जारी करण्यात आला आहे. यातील माहितीनुसार “रिटेल हेल्थ कव्हर’च्या मागणीत 98% वाढ झाल्याचे दिसून आले.
कंपन्यातही “ग्रूप हेल्थ पॉलिसी’अंतर्गत समाविष्ट असलेल्या इन्शुरन्सच्या विक्रीत जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेत “हेल्थ कव्हर’ खरेदी केले आहे. इन्शुरन्स कंपनीच्या ग्रुप हेल्थ पोर्टफोलिओ अंतर्गत, कव्हर केलेल्या इन्शुरन्सची संख्या नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये 1,52,000 वरून नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये 4,15,000 पर्यंत 170% ने वाढली आहे.
मोठ्या शहरांमध्ये आरोग्य विम्याची मागणी वाढली आहे. बंगळुरू, नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, कोलकाता, पुणे या मुख्य शहरात आरोग्य विम्याची मागणी 104.4% ने तर नाशिक, राजकोट आणि वडोदरा यासारख्या छोट्या शहरांमधून हेल्थ कव्हरची मागणी 95% ने वाढली. “डिजिट इन्शुरन्स’ने हा दावा केला आहे.
करोना हा साथीचा रोग सुरू झाल्यापासून, अधिक लोकांना आर्थिक संरक्षणाची गरज भासू लागली आहे. ते सक्रियपणे हेल्थ कव्हर शोधत आहेत. साथीच्या रोगाने निश्चितपणे अधिक व्यक्ती आणि विमाकर्ते यांना गगनाला भिडणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा परिणाम जाणवून दिला आहे आणि त्यापासून संरक्षणासाठी त्यांना आरोग्य विमा खरेदी करण्यास प्रोत्साहित केले आहे, असे तज्ज्ञ सांगतात.