सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा “व्हेरी गुड” श्रेणीत समावेश
सातारा । सह्याद्री लाइव्ह । देशातील प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाचे प्रत्येक चार वर्षातून एकदा मूल्यांकन करण्यात येते. आययूसीएन या जागतिक संस्थेच्या मानकानुसार केंद्र सरकार मार्फत देशातील व्याघ्र संवर्धनात काम केलेल्या अनुभवी तज्ज्ञांकडून असे मूल्यांकन करण्यात येते. व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची परिणामकारकता मूल्यांकन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची कामगिरी उंचावली आहे. व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन अहवालानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची नोंद ‘खूप चांगले’ (very Good) श्रेणीत झाली आहे.
२०१८ च्या मूल्यांकनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ६०.१६% मार्क मिळवून ३७ व्या क्रमांकावर होता. मागील ३ वर्षात क्षेत्रीय व्यवस्थापनात केलेल्या परिणामकारक बदलामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने very Good श्रेणीमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच ५१ व्याघ्र प्रकल्पामध्ये ३७ व्या स्थानावरून २७ व्या स्थानावर प्रगती केली आहे. सद्यस्थितीत रहिवासी वाघांची संख्या नसली तरी दक्षिणेकडून स्थलांतरीत वाघ ये जा करीत असतात. परंतु रानकुत्री, बिबट, अस्वल इ. या शिकारी प्राणी व गवे, सांबर, भेकर, रानडुक्कर इ. या भक्ष्यप्राणांच्या घनतेतही वाढ झाली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना २०१० मध्ये झाल्यापासून २०१०, २०१४, २०१८ मध्ये झालेल्या मूल्यांकनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने “फेअर व गुड” या श्रेण्या मिळवल्या होत्या. या वर्षीच्या अहवालात आतापर्यत प्रथमच “खूप चांगले“ (व्हेरी गुड) श्रेणी मिळाली आहे. याच श्रेणीत देशातील २० व्याघ्र प्रकल्प असून याच श्रेणीत ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, काझीरंगा, कॉर्बेट, सुंदरबन, पन्ना, बांधवगढ, याही व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. गाभा क्षेत्रात येणारी कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्को ने “जागतिक नैसर्गीक वारसास्थळ” म्हणून घोषित केले आहे. व्याघ्र प्रकल्पाचे जंगल हे सह्याद्रीतील उर्वरीत घनदाट व चांगल्या श्रेणीतील शिल्लक राहिलेले जंगल आहे. पश्चिम महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या कोयना व वारणा जलाशयाचे गाळाने भरण्यापासून संरक्षण हे जंगल करीत आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला विशेष महत्व आहे. तसेच १० – १२ नद्यांचा उगम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून होत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या जलसुरक्षेच्या दृष्टीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या व तेथील लोकांच्या विकासामध्ये सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे मत सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर स्थित कराडचे उपसंचालक यु. एस. सावंत यांनी व्यक्त केले.